सिंहगड घाटात कार जळून खाक, चालकाचे प्रसंगावधान; दुर्घटना टळली | पुढारी

सिंहगड घाटात कार जळून खाक, चालकाचे प्रसंगावधान; दुर्घटना टळली

वेल्हे; पुढारी वृत्त सेवा : सिंहगड किल्ल्यावर रविवारी (दि. 8) पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. घाट रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अति दुर्गम उंबरदांड कड्याच्या लगत अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. कारचालकाने प्रसंगावधानता दाखवत कारमधील सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कारने पेट घेताच घाट रस्त्यावर अग्नितांडव सुरू झाले. आगीचे लोट दूर दूर अंतरावर पसरल्यामुळे पर्यटकांची धावपळ सुरू झाली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी घाट रस्ता जवळपास दीड तास बंद करण्यात आला. त्यामुळे गडावर हजारो पर्यटक अडकून पडले होते.

वन विभागाच्या सुरक्षारक्षक व पीएमआरडीएच्या नांदेडसिटी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गडावर गेलेले पर्यटक खाली येत होते. वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूला घाट रस्ता बंद करून वाहतूक रोखली.

कारमध्ये पाच ते सहा जण होते. नाशिक येथून पर्यटनासाठी कार ( चक15 एइ 8659) मधून गडावर चालले होते. आग लागताच सर्व जण गडावरून खाली येणार्‍या वाहनांत बसून निघून गेले. त्यांची नावे समजू शकली नाहीत, असे सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके यांनी सांगितले.

सुरक्षारक्षक रमेश खामकर म्हणाले की, आग लागताच चालकांसह सर्व जण खाली उतरले. आम्ही तेथे गेलो असता न थांबता सरळ सर्व निघून गेले. वनरक्षक बाळासाहेब जिवडे, संदीप कोळी यांच्यासह तानाजी खाटपे, मंगेश गोफणे, नितीन गोळे आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ केली. घाट रस्त्यावरील वाहतूक बंद केल्याने गडावर हजारो पर्यटक अडकून पडले होते.

Back to top button