पुणे : यूजीसीच्या नेट 2023 च्या तारखा जाहीर | पुढारी

पुणे : यूजीसीच्या नेट 2023 च्या तारखा जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएद्वारे घेण्यात येत असलेली राष्ट्रीय पात्रता ऑनलाइन चाचणीसाठी (यूजीसी नेट 2023) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार डिसेंबर 2022 ची नेट परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत होणार आहे.

यूजीसीकडून ‘नेट’ जून आणि डिसेंबरमध्ये घेतल्या जातात. पुढील वर्षाची (2023) पहिली ‘नेट’ 13 ते 22 जूनदरम्यान होईल. दुसरी परीक्षा डिसेंबरात प्रस्तावित आहे. देशातील विविध विद्यापीठांमध्ये ‘सहायक प्राध्यापक’, ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’, ‘असिस्टंट प्रोफेसर’ या पदांसाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

राष्ट्रीय स्तरावरील ही ऑनलाइन पात्रता चाचणी परीक्षा वर्षातून दोनदा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाते. 180 मिनिटांच्या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. पहिल्या प्रश्नपत्रिकेत 50 व दुसर्‍या प्रश्नपत्रिकेत 100 बहुपर्यायी प्रश्न असतात. या परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ केले जात नाही.

अर्जासाठी 17 पर्यंत मुदत
इच्छुक विद्यार्थी ugcnet. nta. nic. in या यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. 17 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज भरले जातील. सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1100 रुपये शुल्क भरावे लागेल. ओबीसी उमेदवारांना 550, तर मागासवर्गीय व दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 275 रुपये शुल्क राहणार असल्याचे ‘एनटीए’व्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Back to top button