ठेव विमा महामंडळ : पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्याच्या ‘रुपी’ला सूचना | पुढारी

ठेव विमा महामंडळ : पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्याच्या 'रुपी'ला सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सुधारित ठेव विमा महामंडळ कायद्यानुसार ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या ठेवींची रक्कम परत करण्याबाबत ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेस सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पाच लाखापर्यंत ठेवी असणार्‍या ठेवीदारांचे सुमारे ९६५ कोटी रुपये लवकरच परत मिळतील, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली.

शिवाय रुपी बँकेत रक्कम अडकून पडलेल्या आणि ती मिळण्यासाठी गेल्या आठ वर्षापासून संघर्ष करणार्‍या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बँकेच्या सर्व ठेवीदारांनी बँकेच्या शाखेमध्ये उपलब्ध केलेल्या विहित नमुन्यातील क्लेम अर्ज दोन प्रतींमध्ये सादर करण्याचे आवाहन रुपी बँकेचे सरव्यवस्थापक नितिन लोखंडे यांनी पत्रकान्वये केले आहे. अर्जासोबत संबंधित ठेवीदारांनी केवायसी कागदपत्रे तसेच ठेव पावतीची पाठोपाठ झेरॉक्स, सेव्हिंग पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स इत्यादी स्व-साक्षांकित करुनच दयावयाची आहे.

तसेच त्यांच्या दुसर्‍या अथवा अन्य बँकेत असणार्‍या बचत अथवा चालू खात्याचा कोरा चेक सही न करता दयावयाचा आहे. चेक कॅन्सल करुन देणे आवश्यक आहे. जर चेक नसेल तर त्या बँकेतील खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत सादर करावी.

बँकेच्या शाखेत अर्ज सादर केल्यानंतर या अर्जाची योग्य ती छाननी शाखा स्तरावर तसेच बँकेच्या मुख्य कचेरीकडून केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण करुन ठेव विमा महामंडळ याकडे १५ ऑक्टोंबर २०२१ पर्यंतच पाठवायचे आहेत. त्यावर त्यांच्याकडून निर्णय होवून त्याप्रमाणे बँकेस सूचना दिल्या जातील.

त्या सूचनांप्रमाणे अर्जांवर बँकेकडून पुढील कार्यवाही केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेस साधारणतः ९० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

रुपी बँक संक्षिप्त

एकूण ठेवीदार संख्या – साडे चार लाख
एकूण ठेवींची रक्कम – १२९३ कोटी
हार्डशिपअंतर्गत दिलेली रक्कम – ३७७ कोटी

चिंचवडमधील आनंद बँकेचे मिळणार १३ कोटी

ठेव विमा महामंडळाच्या निर्णयानुसार चिंचवडमधील श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनाही पाच लाखापर्यंतच्या ठेव रकमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आनंद बँकेत पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांची संख्या १५ हजार २४२ असून ११ कोटी २ लाख ९० हजार रुपये आहेत. तर पाच लाखापेक्षा अधिक ठेवी असणार्‍या ठेवीदारांनाही पाच लाखापर्यंतची रक्कम मिळणार असल्याने सुमारे १३ कोटींच्या आसपास ठेवीदारांना रक्कम परत मिळू शकेल, अशी माहिती बँकेचे प्रशासक शाहुराज हिरे यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

डीआयसीजीसीचे नुकत्याच आलेल्या निर्देशानुसार, पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत कराव्या लागतील आणि ही रक्कम सुमारे ९६५ कोटी रुपये आहे. त्याबाबतचे कार्यालयीन कामकाज डीआयसीजीसीच्या सूचनांप्रमाणे सुरु झाले आहे. ठेवीदारांनी केवायसी पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की बँक अवसानायात जाणार. सर्व ठेवीदारांच्या हिताचे रक्षण आणि बँकेचे विलिनीकरण, लघुवित्त बँकेत रूपांतर अथवा बँकेचे पुनुरूज्जीवन यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरुच राहतील.
– सुधीर पंडित (प्रशासक, रुपी को-ऑपरेटिव्ह बँक)

 

Back to top button