...तर अधिकाऱ्यांसह नेत्‍यांना कचऱ्यात टाकू : मनसे आमदार राजू पाटील - पुढारी

...तर अधिकाऱ्यांसह नेत्‍यांना कचऱ्यात टाकू : मनसे आमदार राजू पाटील

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : दिव्यात आलेले अपयश झाकण्यासाठी 14 गावांतील भंडार्लीत डम्पिंग आणले आहे. कचऱ्याच्या विरोधात पुकारलेले आंदोलन आता आक्रमक होणार आहे. भंडार्ली गावात डम्पिंग आणण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा अधिकाऱ्यांसह नेत्यांनाही आम्ही कचऱ्यात टाकू, असा इशारा मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्‍थानिक नेत्‍यांना दिला आहे. आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार खटल्यांच्या धमक्या देऊन डम्पिंग लादत असाल तर होऊन जाऊदे वाट्टेल तेवढे खटले भरा असा सज्जड दमचं मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक नेत्यांना दिला आहे.

14 गावांमध्ये प्रदूषणाचा राक्षस पोसण्याचा प्रशासनाचा डाव

कल्याणच्या ग्रामीण भागात असलेल्‍या 14 गावांमध्ये प्रदूषणाचा राक्षस पोसण्याचा प्रशासनाचा डाव असून, या गावांपैकी मौजे भंडार्ली गावात कचराभूमी उभारण्याचा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे प्रदूषणाची समस्या वाढविणाऱ्या या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर 14 गावांत गुरुवारी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार राजू पाटील यांनी थेट स्थानिक नेत्या-पुढाऱ्यांसह प्रशासनावर हल्ला चढविला.

ठाणे महापालिकेतील कचरा 14 गावांमधील भंडार्ली येथे टाकण्यासाठी 4 हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे वृत्त सर्वत्र पसरताच गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेच्या या निर्णयाला भंडार्लीतील ग्रामस्थांसह 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने कडाडून विरोध केला आहे. आधीच 14 गावांमध्ये प्रदुषणाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यातच ठाणे महानगरपालिकेचा कचरा जबरदस्तीने या गावांच्या माथी मारत असल्याने सर्व गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या 14 गावांतील ग्रामस्थांच्या बैठकीला आमदार राजू पाटील यांनी दिव्याचे उदाहरण दिले. आक्रमक भूमिका मांडताना आमदार पाटील म्हणाले, दिव्यातील अपयश झाकण्यासाठी डम्पिंग 14 गावांतील भंडार्लीत आणण्याचा प्रशासनाचा डाव आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार सुरू आहे. यात राजकारण केले जात आहे.

14 गावांत डम्पिंग आणलेच तर मात्र उग्र आंदोलन

जर 14 गावांत डम्पिंग आणलेच तर मात्र उग्र आंदोलन उभारले जाईल. कचऱ्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. जनभावना लक्षात घेऊन आधीच प्रदूषणग्रस्त असलेल्या 14 गावांमधील भंडार्लीचा प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प तातडीने रद्द करावा, अन्यथा हे आंदोलन अधिक आक्रमक होईल, असा इशारा देताना आमदार पाटील यांनी भंडार्ली गावात डम्पिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना आम्ही कचऱ्यात टाकू, असा सज्जड दम भरला.

आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार आम्हाला केसेसच्या धमक्या देऊन जर का डम्पिंग लादत असाल तर होऊन जाऊदे केसेस, असा इशारा आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांसह स्थानिक नेत्यांना दिला. विशेष म्हणजे या सभेत आमदार राजू पाटील यांनी भंगारमाफियांना रडारवर आणताना सत्ताधारी आणि भंगारमाफियांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांना याच कचऱ्यातून निवडणूक फंड जमा करायचा असल्याचा गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली.

Back to top button