लाईव्ह म्युझिक बॅण्डचे सादरीकरण अन् डीजे नाईट; पुण्यात 31 डिसेंबरला रात्री रंगणार वैविध्यपूर्ण कार्यक्रम | पुढारी

लाईव्ह म्युझिक बॅण्डचे सादरीकरण अन् डीजे नाईट; पुण्यात 31 डिसेंबरला रात्री रंगणार वैविध्यपूर्ण कार्यक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लाईव्ह म्युझिक बॅण्डचे सादरीकरण…डीजे नाईट…सुफी अन् गझल नाईट अन् हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा सुरेल कार्यक्रमांनी नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे. 31 डिसेंबरला रात्री अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले असून, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी कार्यक्रमांचे तिकिट बुकिंगही मोठ्या प्रमाणात केले आहे.

हॉटेल्स, पब, लॉन्स, सभागृहे अन् मैदांनावर असे कार्यक्रम रंगणार आहेत आणि येथे सेलिब्रिटी कलाकारांचे सादरीकरणही पाहायला मिळणार आहे. लाईव्ह म्युझिक बॅण्डच्या तालावर ठेका धरत पुणेकर नवीन वर्षाचे स्वागत करणार असून, पुण्यात जवळपास 200 ते 300 कार्यक्रम आयोजित केले आहेत. कार्यक्रमांच्या नियोजनासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून इव्हेंट कंपन्या कामाला लागल्या असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

31 डिसेंबरच्या रात्री नऊनंतर सर्व कार्यक्रम सुरू होणार आहेत. ते रात्री बारानंतरही सुरू असतील. कार्यक्रमांसाठी लोकांनीही तिकिट बुकिंग केले असून, अशा कार्यक्रमांना परवानगी मिळाल्याचे काही इव्हेंट कंपन्यांच्या संचालकांनी सांगितले. काही ठिकाणी लाईव्ह ऑक्रेस्ट्रा, शास्त्रीय संगीताची मैफिल अन् सुफी गीतांचा कार्यक्रमही आयोजिला आहे. हॉटेल्स, पब, लॉन्स, सभागृहे अन् मैदानांमधील कार्यक्रम हाऊसफुल्ल असणार आहेत.

यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इव्हेंट कंपन्यांनी जोरदार तयारी केली असून, कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. दिग्गज कलाकारांसह नवोदित कलाकारांच्या सादरीकरणासह काही म्युझिक बॅण्डही सादरीकरण करणार आहेत, तर डीजे सादरीकरणही होईल. कार्यक्रमांसाठी चांगला प्रतिसाद असून, परवानगी मिळाल्याने हॉटेल्स, लॉन्स आणि पबसह विविध ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांना चांगले बुकिंग मिळाले आहे. दरवर्षी पुण्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात. कोरोनामुळे फारसे कार्यक्रम दोन वर्षे होऊ शकले नाही. यंदा नवीन वर्षाची पार्टीत अशा संगीत कार्यक्रमांचा आनंद पुणेकर घेणार असून, इव्हेंट कंपन्यांचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

                      – निखिल कटारिया, इव्हेंट अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे

 

Back to top button