पुणे : उदंड जाहले बिबटे ! स्वत:चे संरक्षण करण्याची जबाबदारी मनुष्यावर | पुढारी

पुणे : उदंड जाहले बिबटे ! स्वत:चे संरक्षण करण्याची जबाबदारी मनुष्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील असा एकही तालुका नाही, जेथे बिबट्याच्या पाऊलखुणा आढळत नाहीत. बारामती, इंदापूर या भागांत काही वर्षांपूर्वी बिबट्याचा अधिवास नव्हता. मात्र, आता तेथे देखील बिबट्या आढळून येत आहे. अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे, तर काही ठिकाणी मानवावर देखील बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळेच बिबट्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी आता खुद्द मनुष्यावरच आली आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आणि डोंगर-दर्‍या आहेत. जंगलक्षेत्र घनदाट असल्याने, तसेच डोंगरदर्‍याचा भाग सदा सर्वकाळ हिरवागार राहत असल्याने या भागात वन्यप्राण्यांचे प्रमाण जास्त आहे. या प्राण्यांमुळेच बिबट्यांना त्यांचे भक्ष्य मिळत असल्याने त्यांची संख्या वाढीस लागली आहे. यासोबतच जिल्ह्यात बागायती क्षेत्र मोठे आहे.

त्यातही बागायती भागात उसाचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे. बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, मावळ भाग, भोर, दौंड, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये ऊसपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कारण या भागात बारमाही पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. परिणामी, बिबट्याला या भागात मोठ्या प्रमाणात लपण क्षेत्र निर्माण झाले आहे. परंतु, जसजसी ऊसतोड सुरू होते तसतसे बिबटे सैरभेर होऊन हल्ले करण्याला सुरुवात करतात आणि त्यामुळेच मानवाला स्वत:चे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे लागते, हे नक्की.

मागील एक महिन्यापासून जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि भोर तालुक्यांत बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आंबेगाव तालुक्यातील मंचर आणि जुन्नर शहरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले. जुन्नर शहरात तर एका वेळी तीन आणि नंतर एक, असे चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. दुसरीकडे मंचर शहरालगतदेखील तीन बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते.

यावरून लपण क्षेत्र कमी झाल्याने बिबट्याने शहरी भागातदेखील पाय पसरविण्यास सुरुवात केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे उसाच्या एका फडात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. यासह अनेक वेल्हे, मुळशी व अन्य तालुक्यांतदेखील बिबट्याचा अधिवास नेहमीच दिसून आला आहे. शिरूर तालुक्यातच पिंपरखेड परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मुलगी व एका युवकाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यामुळेच की काय, बिबट्याने लपण क्षेत्र कमी होताच आपला मोर्चा शहराकडे वळविल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच आता उदंड झाले बिबटे… आणि मानवाची स्व:रक्षणाची जबाबदारी स्वत:ची… अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

माणिकडोह केंद्राची क्षमता केवळ 37
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारण केंद्राची क्षमता केवळ 37 बिबटे ठेवण्याची आहे. सद्य:स्थितीत येथे 37 बिबटे असून, या केंद्राची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे दररोज जिल्ह्यात कोठे ना कोठे बंदिस्त केलेले बिबटे कोठे ठेवायचे? हा प्रश्न आता वन विभागापुढे देखील आहे.

Back to top button