पारगाव : कांदा लागवडीतून महिला मजुरांना हक्काचा रोजगार | पुढारी

पारगाव : कांदा लागवडीतून महिला मजुरांना हक्काचा रोजगार

पारगाव (ता .आंबेगाव ); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात शेजारील खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील महिला मजुरांच्या टोळ्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीच्या कामासाठी दाखल झाल्या आहेत. कांदा लागवडीतून या महिला मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. आंबेगाव तालुक्यात दरवर्षी रब्बी हंगामात कांदा लागवडी सर्वाधिक क्षेत्रात होतात. एका वेळेस अनेक शेतांमध्ये कांदा लागवडी असल्याने महिला मजुरांची आवश्यकता शेतकर्‍यांना भासते.

त्यामुळे परिसरातील शेतकरी हे महिला मजुरांच्या टोळ्यांना बोलावून कांदा लागवडी करून घेतात. इतर शेतीकामांच्या तुलनेत कांदा लागवडींच्या कामाला दिवसाची हजेरी अधिक मिळते. त्यामुळे कांदा लागवडीच्या हंगामात महिला कांदा लागवडीचीच कामे अधिक करतात. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या खेड तालुक्यातील वाफगाव, वरुडे तसेच शिरूर तालुक्यातील पाबळ आदी परिसरातील महिला मजुरांच्या टोळ्या कांदा लागवडीच्या कामासाठी दाखल झाल्या आहेत.

या महिला मजुरांना कांदा लागवडीच्या कामातून दिवसाची हजेरी 300 रुपये मिळत आहे. इतर शेतातील खुरपणी पालेभाज्या काढणीच्या कामांसाठी दिवसाची हजेरी 250 रुपये मिळते. कांदा लागवडीला अधिक पैसे मिळतात. शिवाय कामावर ये-जा करण्याची सोय देखील केलेली असते. या टोळ्या पिकअप, टेम्पो, जीप या वाहनांमधून ये-जा करीत असतात. त्यामुळे या हंगामात प्रामुख्याने महिला मजूर कांदा लागवडीच्या कामाला प्राधान्य देतात.

Back to top button