जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका लवकरच : अजित पवार | पुढारी

जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका लवकरच : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लवकरच जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. सगळीकडे राष्ट्रवादीमय वातावरण तयार झाले असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जुन्या आणि नव्या चेह-यांना एकत्र करणार असल्याचे ते म्हणाले. पक्षामध्ये आलेल्यांना समाधानी करणे महत्वाचे असते आणि तुम्ही काम करा असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिका-यांच्या मांजरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.21) सकाळी झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, लवकरच जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जसे तुम्ही विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसह काँग्रेस मिळून जिल्ह्यात 12 आमदार निवडून दिलेत. शिवाय खासदारपदी डॉ. अमोल कोल्हे यांनाही निवडून दिले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीमय वातावरण झाले आहे. पक्षात शेवटी तळागाळातील कार्यकर्त्यालाही पद मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मांजरी परिसरातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पक्षाच्या कार्यालयातून ताकदीने काम करा. दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील कार्यक्रमस्थही धावती भेट दिली.

Back to top button