कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एका व्यक्तीने आपल्या पत्नीसमोर तरूणी व तिच्या आईवर गोळीबार केला. हा जिवघेणा हल्ला करणाऱ्या पाचगाव ( ता. करवीर) येथील संशयित ऋषिकेश बाबुराव कोळी याच्याकडून करवीर पोलिसांनी मंगळवारी बारा बोअरची गावठी बंदूक हस्तगत केली. हल्ल्यात छऱ्याच्या बंदुकीचा वापर केल्याचे भासवून संशयिताने पोलिसांची दिशाभूल केली होती. चौकशीत त्याचे बिंग फुटले.
प्रेमप्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पत्नी अर्चना, पिडीत तरूणी व तिची आई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. यावेळी संतापलेल्या ऋषिकेशने पत्नीसमोरच तरूणीसह तिच्या आईवर गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. कळंबा तलावजवळील बंधाऱ्यावर शुक्रवारी ( दि.१७) सकाळी ही घटना घडली होती. याप्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती.
करवीर पोलिसांनी हल्लेखोर ऋषिकेश व त्याची पत्नी अर्चना हिला अटक केली. या अटकेतनंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याचे भासवून त्याने इयरगन पोलिसांच्या स्वाधिन केले होते.
तरूणीसह तिची आई गंभीर जखमी झाल्याने संशयिताने स्वत:हून हजर केलेल्या शस्त्राबद्दल तपासाधिकाऱ्यांना शंका होती. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकरसह पथकाने संशयिताकडे चौकशीचा ससेमिरा लावल्यानंतर त्याचे बिंग फुटले. आज सायंकाळी गुन्ह्यात वापरलेली गावठी बनावटीची बारा बोअरची बंदूक त्याने पोलिसांच्या हवाली केली. ही बंदूक कोठून उपलब्ध केली,याची चौकशी सुरू असल्याचेही कोळेकर यांनी सांगितले.