पुणे: अचानक कारचा टायर फुटला, सुट्टीसाठी निघालेले बहिण-भाऊ मळदजवळील भीषण अपघातात ठार | पुढारी

पुणे: अचानक कारचा टायर फुटला, सुट्टीसाठी निघालेले बहिण-भाऊ मळदजवळील भीषण अपघातात ठार

रावणगाव (दौंड, पुणे) , पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे पुण्याकडून भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडी दुभाजकावरून विरुद्ध बाजूच्या लेनवरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. या अपघातात स्विफ्टमधील बहिण व भाव दोघेही ठार झाले. हा अपघात गुरुवारी (दि. २२) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बहिण-भावाची नावे शिल्पा तुलशी गिरी (वय ३०) आणि साधव गौरव गिरी (वय २४, दोघेही रा. भालकी, जि. बिदर) अशी आहेत.
,
पुण्याकडून भालकी (जि. बिदर)कडे सुट्टीसाठी स्विफ्ट (एमएच ०६ बीयु ४०८९) गाडीने भरधाव वेगात जात असताना मळद हद्दीत अचानक स्विफ्टचा टायर फुटला. त्यामुळे स्विफ्ट दुभाजक ओलांडून विरोधी बाजूच्या सोलापूर लेनवरील कंटेनरला (एमएच ४३ वाय ४६६९) जोरात धडकली. कंटेनरच्या धडकेने स्विफ्टच्या पुढील व डाव्या बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या घटनेत स्विफ्टमधील शिल्पा तुलशी गिरी यांचा घटनास्थळीच तर गाडीचालक त्यांचा भाऊ साधव गौरव गिरी यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा तपास दौंड पोलिस करीत आहेत.

Back to top button