पिंपरी: उद्योजकांना स्पूफिंगचा फटका, ई-मेलमध्ये बदल करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक | पुढारी

पिंपरी: उद्योजकांना स्पूफिंगचा फटका, ई-मेलमध्ये बदल करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

संतोष शिंदे

पिंपरी (पुणे): पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या अनेक कंपन्यांचे विदेशातील कंपन्यांशी नियमित आर्थिक व्यवहार सुरू असतात. कच्च्या मालाची देवाण- घेवाण केल्यानंतर दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी ई-मेल आयडीवरूनच एकमेकांशी संवाद साधतात. याचाच फायदा घेत सायबर चोरटे विदेशातील कंपनीच्या मेल – आयडीमध्ये लक्षात न येण्यासारखा एखाद्या अक्षराचा बदल करतात. विदेशी कंपनीशी मिळताजुळता मेल-आयडी तयार केल्यानंतर चोरटे त्या बनावट मेल आयडीवरून भारतातील कंपन्यांशी संपर्क साधतात. काही तांत्रिक अडचणीमुळे बँक बदलली असल्याचे सांगून नवीन बँकेचे तपशील पाठवून त्यावर व्यवहार करण्यास सांगितले जाते. त्यानुसार, येथील कंपन्या नवीन बँकेच्या खात्यावर पैसे पाठवतात. काही दिवसांनी विदेशातील संबंधित कंपनीला पैसे पोहोचले नसल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कंपन्यांच्या लक्षात येते.

उशिरा तक्रारीमुळे तपासात अडचणी :

शहरातील कंपन्यांचे पदाधिकारी विदेशातील कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांशी थेट संपर्कात नसतात. त्यामुळे येथील कंपन्यांना आपली फसवणूक झाल्याचे सात ते आठ दिवसांनंतर लक्षात येते. दरम्यानच्या काळात चोरटे बँक खात्यावर आलेली रक्कम इतर खात्यांवर हस्तांतरित करून पैसे काढून घेतात. त्यामुळे पैसे माघारी मिळवण्यास पोलिसांना अडचणी येतात.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी

फसवणूक झाल्याची तक्रार आल्यानंतर सुरुवातीला यामध्ये गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर ई -मेलवर झालेल्या संभाषणाची प्रत आणि ज्या बँकेत पैसे हस्तांतरित झाले आहेत, त्याची प्रत अभ्यासली जाते. तपास अधिकारी गुगलकडे पत्र व्यवहार करून संबंधित ई-मेल आयडीची माहिती मागवतात. मात्र, अनेक प्रकरणांत आलेली माहिती ही चुकीची असते. तपासी अधिकारी हस्तांतरित झालेल्या बँकेला पत्रव्यवहार करून संबंधित खात्याचे तपशील मागवतो. अनेकदा हस्तांतरित झालेले खाते तिसर्‍याच्याच नावावर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच जाते.

बाहेर देशातून ऑपरेटिंग :

तपास अधिकारी ज्या वेळी गुन्ह्याच्या उगम स्थानापर्यंत पोहोचतो तोपर्यंत उशीर झालेला असतो. अनेक प्रकरणांत फसवणूक झालेली रक्कम विदेशात गेल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे रॅकेट विदेशात बसून चालवले जात असल्याने तपासात अडचणी येत असल्याचे तपास अधिकारी सांगतात.

बनावट ई-मेलद्वारे बँक खाते बदलले असल्याचे सांगून कंपनीची 37 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 17 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बाणेर येथे घडली. याप्रकरणी सुनील भाऊ एरणकर (35, रा. बाणेर, पुणे) यांनी 30 नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ुरीळीींळरलररिलळषळल-ीस.लेा या अज्ञात ई-मेलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

अशी घ्या काळजी:

१. पैशाची मागणी करणारे ई-मेल आयडी बारकाईने बघावेत.
२. आर्थिक व्यवहार करताना मोफतचे इ-मेल वापरू नयेत. VSNL, NIC यासारखे पेड ई-मेल आयडी वापरावेत.
३. आर्थिक व्यवहारांशी संबंधित ई-मेल कंपनीतील एकाच व्यक्तीने वापरावा
४. आर्थिक व्यवहार व महत्त्वाचे ई मेल पाठवण्यासाठी डिजिटल सिग्नेचरचा वापर करावा.
५. encryption बरोबर किंवा स्वतंत्रपणे पासवर्ड प्रोटेक्टर ई-मेल पाठवावा. जेणेकरून संपर्क करण्यासाठी किमान दोन माध्यमे वापरली जातील.

Back to top button