शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा पुण्यात घेतोय आकार | पुढारी

शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा पुण्यात घेतोय आकार

सारोळा; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा अश्वारुढ पुतळा पुण्यात तयार होत आहे. हा पुतळा औरंगाबाद येथील क्रांती चौकात  उभारण्यात येणार आहे. हा २१ फुटी भव्य पुतळा पुण्यातील धायरी येथील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे, संतोष पवार यांच्या स्टुडिओमध्ये आकार घेत आहे. या पुतळ्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. उद्योग मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी( दि.९) या पुतळ्याची पाहणी केली.

यावेळी औरंगाबादचे आमदार प्रदीप जैस्वाल ,आमदार अतुल सावे , आमदार संजय शिरसाट ,औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले ,औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे उपस्थितीत होते.

यादव आणि मुगलकालीन वारसा स्थळांनी प्रसिद्ध पावलेल्या औरंगाबाद शहराच्या क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराज यांचा हा २१ फूट उंचीचा अश्वारूढ धातूचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे.

शिवाजी महाराज

साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबादच्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्रांती चौकामध्ये तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकार भाऊसाहेब साठे यांनी घडवलेली शिवाजी महाराज यांची बारा फुटी अश्वारूढ धातूतील शिल्पकृती बसवली होती. परंतु कालानुरूप औरंगाबाद शहराचा विकास होत गेला. त्यामुळे क्रांती चौकाचा चेहरामोहराच बदलून गेला. येथे एका उत्तुंग उड्डाणपुलाची निर्मिती झाली.

 

हे शिवरायांचे अश्वारूढ शिल्प झाकले जाऊ लागल्याने राज्य सरकारने पूर्वी असलेल्या बारा फुटी पारंपारिक पद्धतीच्या शिल्पाच्या ठिकाणी २१ फूट उंचीचे धातूतील शिवरायांचे अश्वारूढ शिल्प बसवण्याचा निर्णय घेतला. सध्या पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे, संतोष पवार यांच्याकडे या शिल्पाच्या निर्मितीची जबाबदारी आहे.

 

Back to top button