इंदापूर : निरा नदीवरील सर्व बंधार्‍यांची गळती थांबवा : हर्षवर्धन पाटील | पुढारी

इंदापूर : निरा नदीवरील सर्व बंधार्‍यांची गळती थांबवा : हर्षवर्धन पाटील

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात निरा नदीवरील बोराटवाडी, खोरोची, पिठेवाडीसह इतर बंधार्‍यांमधून पाण्याची गळती थांबविण्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी सूचना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ’जलसंपदा’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना शनिवारी (दि. 17) केली. सूचनेनुसार बोराटवाडी, खोरोची आदी बंधार्‍यांना ’जलसंपदा’च्या अधिकार्‍यांनी तातडीने शनिवारीच भेट देऊन पाण्याची गळती बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

बंधार्‍यांमधून होणारी गळती बंद करण्यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी ’जलसंपदा’चे पुणे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, बारामती विभागाचे उपअभियंता अश्विन पवार, शाखा अभियंता झगडे, के. एस. सावंत यांच्याशी तत्काळ कार्यवाहीसाठी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार शाखा अभियंता झगडे, सावंत यांनी बोराटवाडी, खोरोची बंधार्‍याची पाहणी करून उद्यापासून गळती थांबविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे शेतकर्‍यांशी बोलताना नमूद केले.

निरा भीमा कारखान्याचे माजी संचालक आदिनाथ पाटील, दूधगंगा संघाचे संचालक दयानंद गायकवाड, शहाजी पाटील, कांतिलाल नरुटे, संतोष फडतरे, दत्तू फडतरे यांच्यासह बोराटवाडी, खोरोची येथील शेतकर्‍यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क करून याबाबत तक्रार केली होती.

 

Back to top button