महिलेचा गळा आवळून खून, संशयित आराेपी ताब्‍यात - पुढारी

महिलेचा गळा आवळून खून, संशयित आराेपी ताब्‍यात

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महिलेचा गळा आवळून खून झाल्‍याची घटना साेमवारी सकाळी सहाच्‍या सुमारास देहूरोड नजीकच्या घोराडेश्वर डोंगरावर उघडकीस आली. शरीरसंबंधास नकार दिल्‍याने चुलत दिराने भावजयीचा गळा आवळून खून केल्‍याचे प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. संशयित आराेपीस पाेलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

मिताली सोमनाथ धडस (वय २५, सध्या रा. थॉमस कॉलनी, देहूरोड.  मुळ रा. दहिवडी, सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा चुलत दिर तुकाराम कोंडीबा धडस (वय २४) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिताली आणि संशयित तुकाराम हे रविवारी (दि. १९) घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपीने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली.  त्यास विरोध केल्याने संशयित आरोपीने महिलेने गळा आवळून खून केला.

ओळख पटू नये यासाठी महिलेच्या डोक्यात दगड घालून मृतदेह झुडपात फेकून दिला. दरम्यान, सोमवारी सकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेची ओळख पटवून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button