मनोहर भोसले याला न्यायालयीन कोठडी; करमाळा पोलिसांकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु  | पुढारी

मनोहर भोसले याला न्यायालयीन कोठडी; करमाळा पोलिसांकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु 

बारामती; पुढारी वृत्तसेवा :  संत श्री. बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात  १० सप्टेबरपासून पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर भोसले  (वय २९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याची बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या गुन्ह्यातील मनोहर भोसले याचा सहकारी ओंकार शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. या गुन्ह्यातील विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा हा अद्याप फरार आहे.

बारामती तालुका पोलिसांनी अटक केल्यानंतर मनोहर भोसले याला सुरुवातीला पाच तर त्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्या कोठडीची मुदत रविवारी (दि. १९) रोजी संपली. त्याच्यासह शिंदे याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांनी मनोहर भोसलेला  न्यायालयीन कोठडीत तर शिंदे याला तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शिवाय बलात्काराच्या गुन्ह्यात करमाळा पोलिसांच्या ताब्यात भोसले याला देण्यास न्यायालयाने परवानगी दिली. त्यानुसार करमाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

बारामतीतील शशिकांत सुभाष खऱात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत  मनोहर भोसले व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीच्या वडिलांचा कर्करोग बरा करतो, असे सांगत जिविताची भिती घालत २ लाख ५१ हजार रुपये घेतले. पैसे परत मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा बारामती तालुका पोलिसात दाखल आहे. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व  उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात भोसले याला १० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातील सालपे येथील एका फार्महाऊसवरुन अटक केली होती.

पोलिसांची भूमिका संशयास्पद; उच्च न्यायालयात जाणार

मनोहर भोसले यांना रविवारी बारामती न्यायालयापुढे हजर केले असता सरकार पक्षानेच त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. पोलिसांची ही भूमिका संशयास्पद आहे. एकीकडे शिंदे यांस अटक केली असताना पोलिसाना एकत्रित तपास करता आला असता. पण त्यांनी थेट न्यायालयीन कोठडीची मागणी करणे संशयास्पद आहे. या मुद्द्यासह सालपे येथून अटक करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची पोलिसांकडून पायमल्ली झाली आहे. या मुद्द्यांसंबधी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेत न्याय मागणार आहोत.

ॲड. रुपाली ठोंबरे, मनोहर भोसले यांच्या वकील

हेही वाचलंत का :

ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

Back to top button