पिंपरी : गोवर झालेल्या बालकांच्या संख्येत वाढ | पुढारी

पिंपरी : गोवर झालेल्या बालकांच्या संख्येत वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरामध्ये गोवर झालेल्या बालकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत गोवरचे एकूण 13 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये थेरगाव परिसरात नव्याने 3 तर, मोशी येथे एक बाधित रुग्ण आढळला आहे. शहरामध्ये 29 नोव्हेंबरला सर्वप्रथम कुदळवाडी परिसरात गोवरचे 5 बाधित रुग्ण आढळले. तर, गेल्या 11 महिन्यांत 3 जणांना यापूर्वी गोवरची लागण झाली होती, असे एकूण 8 बाधित रुग्ण होते. मात्र, हा आकडा वाढून आता 13 रुग्णसंख्येवर जाऊन पोहोचला आहे.

नव्याने वाढलेल्या 5 रुग्णांमध्ये एक नेहरुनगर परिसरातील आहे. मात्र, या रुग्णाचा जून महिन्यातील अहवाल आत्ता प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो गोवरचा जुना रुग्ण आहे. तथापि, थेरगाव येथील कुमार प्रॉपर्टीजमध्ये 2, डांगे चौक परिसरात 1 आणि मोशी येथे 1 असे एकूण 4 गोवरचे रुग्ण नव्याने आढळले आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

गोवरचे नव्याने रुग्ण आढळलेल्या परिसरात आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच, महापालिका वैद्यकीय विभागाकडून या परिसरात सर्वेक्षण केले जात आहे. 5 वर्षाखालील बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे.

– डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

Back to top button