मंचर : सहकार उद्ध्वस्त करण्यासाठीच ‘ते’ पुण्यात | पुढारी

मंचर : सहकार उद्ध्वस्त करण्यासाठीच ‘ते’ पुण्यात

मंचर; पुढारी वृत्तसेवा : ‘पतसंस्था सुरू करण्यासाठी काय करावे लागते, हे ज्यांना माहीत नाही त्यांना पतसंस्थेचे महत्त्व कळणार नाही. भाजप पक्षाला सहकार उद्ध्वस्त करायचे आहे. त्यासाठीच ते येथे आले होते,’ असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता माजी मंत्री सचिन अहिर यांनी बुधवारी (दि. 7) लगावला.

माजी मंत्री सचिन अहिर यांनी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंचर येथील पतसंस्थेच्या गैरकारभाराबाबत चौकशी करून राज्यभरातील सर्व पतसंस्थांच्या कारभाराची चौकशी होण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकारांनी अहिर यांना विचारले असता ते म्हणाले, की पतसंस्था उभ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. तसेच, पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. ग्रामीण-शहरी भागातील कष्टकरी, शेतकरी, महिला यांना पतसंस्थेच्या माध्यमातून मदत होते.

त्यामुळे एखाद्या पतसंस्थेत गैरकारभार झाला, तर त्यावरून सर्व पतसंस्थांमध्ये गैरकारभार होतो, असे म्हणणे उचित होणार नाही. ग्रामीण भागात असणार्‍या पतसंस्था या कष्टकरी, शेतकरीवर्गासाठी महत्त्वाच्या असून, अनेक पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होत असल्याने विविध तरुण उद्योजक, व्यावसायिक घडले असल्याचेदेखील आ. अहिर म्हणाले. या वेळी त्यांनी आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात मनुष्यावर वारंवार बिबट्याचे होणारे हल्ले लक्षात घेता शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी पक्षाच्या वतीने महावितरणला निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

सर्वांचेच गैरसमज दूर करू
मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे आणि राजाराम बाणखेले यांनी त्याच्यातील वादाबाबत माजी मंत्री सचिन अहिर यांना प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, तसे काही वाटत नाही. परंतु, समज आणि गैरसमज असेल तर दूर करू.

Back to top button