केडगाव : कंटेनरच्या धडकेने रेल्वे सुरक्षा कमान कोसळली | पुढारी

केडगाव : कंटेनरच्या धडकेने रेल्वे सुरक्षा कमान कोसळली

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : रस्ता चुकलेल्या अवजड वाहतूक ट्रकने रेल्वफाटक सुरक्षेसाठी उभारलेल्या कमानीला धडक दिल्याने तो कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रविवारी (दि. 4) रात्री साडेअकाराच्या दरम्यान बोरीपार्धी-नानगाव रस्त्यावर हा अपघात घडला. अपघातात ट्रकची (एचआर 38 एक्स 7641) समोरील काच फुटली. तसेच कमानीवरील लोखंडी बाजू पूर्ण कोसळली. अपघात रात्री झाल्याने रस्त्यावरील अन्य वाहतूक आणि ग्रामस्थांना हानी पोहचली नाही.

केडगाव रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला बोरीपार्धी गावात रेल्वे क्रॉसिंग गेट आहे. रेल्वे वाहून नेणार्‍या विजेच्या तारांना कसलाही अडथळा होऊन अपघात होऊ नये, यासाठी गेटवर दोन्ही बाजूला ठरावीक उंचीची लोखंडी कमान उभारली आहे. यातील एक कमान गावठाणात शिंदे वस्तीलगत नानगावकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे. रविवारच्या रात्री चाकणकडून कंटेनर विजयवाडासाठी निघालेला होता.

मात्र, चालकाला रस्ता न समजल्याने त्याने शिरूरमार्गे बोरीपार्धीत ट्रक घातला. तेथून नानगावकडील रस्त्याने चाललेला असताना कमानीच्या वरच्या भागाला त्याने धडक दिली. अपघातानंतर रेल्वे सुरक्षा बलचे उपनिरीक्षक विजय कुमार आणि त्यांचे कॉन्स्टेबल पी. ए. भोसले यांनी ट्रकचालक जमशेद खानला ताब्यात घेतले आहे.

Back to top button