बारामती : पतीच्या खूनप्रकरणी जन्मठेप | पुढारी

बारामती : पतीच्या खूनप्रकरणी जन्मठेप

बारामती : पतीचा दगडाने ठेचून, विळ्याने वार करून खून केल्याच्या खटल्यात शोभा अनिल इंगळे (रा. साळोबावस्ती, खुटबाव, ता. दौंड) हिला येथील जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शोभा हिच्यावर पती अनिल संतोष इंगळे यांचा खून केल्याचा आरोप होता.

दौंड तालुक्यातील खुटबाव येथे 23 ऑगस्ट 2015 रोजी ही घटना घडली. अनिल संतोष इंगळे व शोभा अनिल इंगळे या पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती. याच कारणावरून शोभा हिने पतीच्या डोक्यात दगड घातला. तसेच विळ्याने वार करत पतीचा खून केला. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात अनिल इंगळे यांचे भाऊ सुनील संतोष इंगळे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार शोभा हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस अधिकारी आर. के. गवळी यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून दहा साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील सुनील वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शोभा इंगळे हिला सुनावली.
यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी मदने यांनी काम पाहिले. पोलिस नाईक वेणूनाद ढोपरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक एन. ए. नलवडे यांनी त्यांना सहकार्य केले.

Back to top button