वडगाव मावळ : भाजपने केला राष्ट्रवादीच्या मदतीने राष्ट्रवादीचाच गेम ! | पुढारी

वडगाव मावळ : भाजपने केला राष्ट्रवादीच्या मदतीने राष्ट्रवादीचाच गेम !

गणेश विनोदे : 

वडगाव मावळ : मावळ तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या खादी ग्रामोद्योग संघ, खांड सोसायटीपाठोपाठ आज झालेल्या खरेदी विक्री संघाच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदांच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने राष्ट्रवादीचाच करेक्ट कार्यक्रम करत चांगलाच धक्का दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता, तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मावळ तालुका खादी व ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीवरून गेली महिनाभर राजकीय डावपेच रंगले होते. यापूर्वी या पदांच्या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेस भाजप व रिपाइं युतीचे पाच सदस्य उपस्थित होते.

मात्र, राष्ट्रवादीचे पाच सदस्य गैरहजर राहिल्याने निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेपूर्वी भाजप-रिपाई नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एका सदस्याला काबीज करून बहुमताच्या जोरावर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदे मिळवली होती.

खांड सोसायटीमध्येही भाजपच

त्याच दिवशी झालेल्या खांड सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या एका सदस्याला काबीज करून दोन्ही पदांवर प्रत्येकी एका मताने विजय मिळवून सत्ता मिळवली आणि एकाच दिवशी राष्ट्रवादीला दुसरा धक्का दिला होता.

भाजपच्या या धक्का तंत्राची पुनरावृत्ती

आजही भाजपच्या या धक्का तंत्राची पुनरावृत्ती झाली आणि तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले. मावळ तालुका खरेदी विक्री संघामध्ये राष्ट्रवादीचे 13 व भाजपचे अवघे 3 सदस्य असताना चेअरमन पदासाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला 9 तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 6 मते मिळाली आणि राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या खरेदी विक्री संघाचे चेअरमनपद भाजपने काबीज केले.

राष्ट्रवादीची चिंता वाढली

गेल्या चार दिवसांत भाजपने राष्ट्रवादीचाच वापर करून सलग तिसर्‍यांदा करेक्ट कार्यक्रम केल्याने राजकीय वर्तुळात विशेषतः सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच, यामुळे राष्ट्रवादीचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने पक्षाच्या दृष्टीने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.

Back to top button