पुणे : प्रत्येक जिल्ह्याचा ऑनलाईन जल आराखडा | पुढारी

पुणे : प्रत्येक जिल्ह्याचा ऑनलाईन जल आराखडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आजवर कोणत्या जिल्ह्यात किती पाणी भूगर्भात शिल्लक आहे, याची माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, आता ते शक्य झाले असून, भूजल सर्वेक्षण विभाग हे काम करणार आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्याचा भूजल आराखडा तायर केला जाणार असून, तो ऑनलाईन असल्याने सर्वांना पाहता येईल, अशी माहिती राज्याचे भूजल सर्वेक्षण आयुक्त चिंतामण जोशी यांनी एका कार्यक्रमात दिली.

वनराई संस्थेने शाश्वत जल या विषयावर काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की भूजल या विषयावर ग्रामीण भागात जेवढी माहिती दिली जाते तितकीच शहरी लोकांना करून देणे गरजेचे आहे. कारण शहरात बोअरवेलचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. पण, त्याची शाश्वती नाही. भूजल विभागाने आता ऑटो अपडेशनवर लक्ष केंद्रित केले असून, राज्यातील 4 हजार विहिरी व दीड लाख बोअरवेलचा डेटा गोळा केला आहे. त्याव्दारे कोणत्या जिल्ह्यात जमिनीखाली किती पाणी आहे, हे कळणार आहे.

इमारती बांधतांना सर्व्हे गरजेचा..
शहरात इमारती बांधतांना भूगर्भात असलेला पाण्याचा स्रोत (अ‍ॅक्युफर) हे सर्रासपणे नष्ट केला जातो, त्याकडे प्रशासकीय पातळीवरून लक्ष देण्याची गरज आहे. तेथे लागलेले पाण्याचे झरे पूर्ण कोरडे पडेपर्यंत पाणी उपसून फेकले जाते, असेही जोशी यांनी सांगितले.

सॅटेलाईटव्दारे मॅपिंग करणार..
सटेलाईव्दारे प्रत्येक शहराच्या भूगर्भाचे मॅपिंग करून भूजल संपत्ती किती आहे, हे आता कळू शकेल. एकास हजार या गुणोत्तरात ते मॅपिंग तयार करणे सुरू आहे. जिल्ह्यात किती विहिरी, बोअर, झरे आहेत ते आता कळू शकेल, ते काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले. या कार्यक्रमास वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया,ज्येष्ठ संशोधक सुहास वाणी, जलसंवाद मासिकाचे संपादक डॉ. दत्ता देशकर उपस्थित होते.

Back to top button