पुणे : मातंग समाजाच्या प्रगतीचे ‘बार्टी’ केंद्र ठरेल : डॉ. श्रीपाल सबनीस | पुढारी

पुणे : मातंग समाजाच्या प्रगतीचे ‘बार्टी’ केंद्र ठरेल : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ’बार्टी’ ही मातंग समाजाला प्रगतीच्या आणि विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी संस्था आहे. भविष्यकाळात ’बार्टी’ ही मातंग समाजाच्या प्रगतीचे व विकासाचे केंद्र बनेल, असा विश्वास महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.
’बार्टी’ येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंच या नावाने स्थापन झालेल्या संस्थेच्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. ’बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक बुधवारी (दि. 30) पार पडली.

डॉ. सबनीस म्हणाले, ’गजभिये यांनी महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित मातंग समाजाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मग त्या योजना विद्यार्थ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि स्पर्धा परीक्षांपासून ते स्त्रियांच्या बचत गटापर्यंत आहेत. त्याचा या समाजाने लाभ घ्यावा. ’

डॉ. सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंच या संस्थेचे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले. हे मंडळ मातंग समाजाच्या प्रश्नांवर अहवाल बार्टी संस्थेला सादर करून मातंग समाजाच्या विकासाला पाठबळ देणार आहे. या बैठकीला पुणे जिल्ह्यातून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, शासकीय व निमशासकीय क्षेत्रांतील मातंग समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Back to top button