पुणे : 1208 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ; ग्रामपंचायत निवडणुकांमुळे निर्णय | पुढारी

पुणे : 1208 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ; ग्रामपंचायत निवडणुकांमुळे निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील ’अ’ आणि ’ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यांवर दिनांक 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश दिला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही सुरू असल्याने तणाव टाळण्यासाठी प्रामुख्याने ’अ’ वर्गातील 38 आणि ’ब’ वर्गातील 1170 मिळून एकूण 1208 सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. शासनाचे विशेष कार्य अधिकारी आणि सहकारी संस्थांचे सह निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. 29) जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

त्या ग्रामपंचायतीचा निकाल 20 डिसेंबर 2022 रोजी असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 23 डिसेंबर आहे. तर, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार सद्य:स्थितीत ’अ’ वर्गातील 38, ’ब’ वर्गातील 1170, ’क’ वर्गातील 3151 आणि ’ड’ वर्गातील 2788 मिळून 7 हजार 147 सहकारी संस्थांच्या निवडणुकाही सुरू आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरू असल्याने गावागावांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच ’अ’ आणि ’ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या मोठी असून, ’अ’ वर्गातील सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचशे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदविता यावा, यासाठी शासनाने ’अ’ आणि ’ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरी, सेवक सहकारी पतसंस्था, कर्मचारी बँका, नागरी बँकांच्या निवडणुका प्रामुख्याने पुढे ढकलल्या गेल्याचे सांगण्यात आले.

Back to top button