रस्ते अपघातात चार ठार; पुणे-नगर, पुणे-सोलापूर हायवेवर अपघात | पुढारी

रस्ते अपघातात चार ठार; पुणे-नगर, पुणे-सोलापूर हायवेवर अपघात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांत झालेल्या अपघातांत चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पाण्याच्या टँकरने पाठीमागून दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी देखील जखमी झाला आहे. युसूफ दाऊद शेख (वय 42, रा. ताडीवाला रोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सहप्रवासी उल्हास पाटील हे जखमी झाले आहेत.

हा अपघात 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी नगर-पुणे रस्त्यावर झाला. याबाबत जुबेदा शेख यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर हायवे कवडीपाट टोलनाक्याजवळ कदमवाकवस्ती येथे झालेल्या अपघातात हरिदास मधुकर गरड (वय 37, रा. चिंतामणी पार्क, गणेशवाडी, थेऊर) यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या पिकअप टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात 22 नोव्हेंबर रोजी रात्री झाला होता.

हरिदास यांचा भाऊ नितीन गरड यांनी लोणी कळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध हरिदास यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत व्यंकट प्रकाश नागदे (घोटाळे,वय 40, रा. शिंदे रोडलाईन्स सोरतापवाडी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात 22 नोव्हेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजता झाला. देविदास नागदे ( रा. गणेशनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीस्वाराचा पोलिस शोध घेत आहेत.

हडपसर उड्डाणपुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात चेतन प्रकाश राऊत (वय 39, रा. वृंदावन सोसायटी, हडपसर) यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शशिकांत गायकवाड (रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button