शेळगावला 14 एकर ऊस जळाला | पुढारी

शेळगावला 14 एकर ऊस जळाला

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शेळगाव (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास महावितरण कंपनीच्या विद्युत तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडून आग लागली. यामध्ये जवळपास 14 एकरांतील उसाचे व ठिंबक सिंचन साहित्याचे जळून नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. जवळपास 50 हून अधिक नागरिकांना आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. या वेळी 200 हून अधिक एकर उस जळण्यापासून वाचला आहे.

या आगीत शेळगाव येथील अभिजित लक्ष्मण शिंगाडे यांचे एक एकर क्षेत्रातील ऊस व पाइप तसेच ठिंबक सिंचन साहित्य जळून 1 लाख 7 हजारांचे नुकसान नुकतेच झाले. अक्षय सुभाष शिंगाडे यांचे 1 हेक्टर 90 आर क्षेत्रातील ऊस, पाइप व ठिंबक साहित्य जळून 3 लाख 35 हजारांचे, राहुल रामदास शिंगाडे यांचे 1 हेक्टर 52 आर क्षेत्रातील ऊस, पाइप व ड्रीप साहित्यचे 3 लाख 99 हजारांचे, अमरजित लक्ष्मण शिंगाडे यांचे 1 एकर क्षेत्रातील ऊस, पाइप व ड्रीपजळून 1 लाख 6 हजार तसेच वसंत बाबूराव शिंगाडे यांचे 1 हेक्टर 20 आर क्षेत्रातील उसाचे पाइप व ड्रीपचे 3 लाख 21 हजार एवढे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी छत्रपती कारखान्याचे संचालक अ‍ॅड. लक्ष्मण शिंगाडे, सरपंच रामदास शिंगाडे यांसह परिसरातील अन्य शेतकर्‍यांनी तसेच युवकांनी आग नियंत्रणात आणली. शेळगावचे तलाठी विठ्ठल पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला व तो पुढील कार्यवाहीसाठी इंदापूर तहसील कार्यालयात सादर केला.

Back to top button