पुणे : कोरोनामुळे मृत झालेल्या थकीत कर्जदारांची माहिती मागवली | पुढारी

पुणे : कोरोनामुळे मृत झालेल्या थकीत कर्जदारांची माहिती मागवली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत मृत झालेल्या थकीत कर्जदारांची जिल्हा तसेच नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांकडून सहकार आयुक्तालयाने तत्काळ माहिती मागविली आहे. तशा सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यातील सर्व विभागीय सह निबंधक आणि जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.

कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कोरोना कालावधीत घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. मयत कर्जदाराचे राहते घर, इतर मालमत्ता तारण असल्यास अशा वेळी त्याच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

कोविडमुळे निधन झालेल्या व मालमत्ता तारण असलेल्या विभाग आणि जिल्ह्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्थांमधील थकीत कर्जदारांची माहिती लवकरात लवकर सहकार आयुक्तालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी पत्रान्वये केली आहे. त्यामध्ये जिल्हा बँक, नागरी सहकारी बँक, पतसंस्थेचे नाव, मृत झालेल्या कर्जदाराचे नाव, मंजूर कर्जाची रक्कम, तारण मालमत्तेचा तपशील, थकीत कर्जाची एकूण रक्कम, अनुत्पादक कर्जाची (एनपीए) वर्गवारी, वसुलीची सद्यस्थिती अशा स्वरूपात ही माहिती मागविण्यात आली आहे.

एकरकमी परतफेड, व्याज सवलतीचे प्रयत्न
कोरोनामध्ये मृत झालेल्या कर्जदाराच्या कुटुंबीयांकडे वित्तीय संस्थांकडून रक्कम वसुलीचा तगादा सुरू असतो. घरच्या नाजूक स्थितीत अशा अडचणीतील कुटुंबासाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून शासन स्तरावर काही धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मृत कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस), कर्जावरील व्याजात सूट मिळण्यासाठी काही प्रयत्न करण्याकामी ही माहिती तत्काळ मागविण्यात आपल्याचे सांगण्यात आले. ज्याद्वारे वित्त पुरवठा करणार्‍या संस्थांची वसुली वेळेत होऊन कर्जदारांनाही दिलासा देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती सहकार आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

Back to top button