पुणे : वाहन विमा नूतनीकरणासाठी पीयूसीचे बंधन! | पुढारी

पुणे : वाहन विमा नूतनीकरणासाठी पीयूसीचे बंधन!

दिनेश गुप्ता

पुणे : विम्याचे महत्त्व काय असते, ते अपघात झाल्यावर कळते. वाहनाचा पूर्ण विमा असला की कितीही नुकसान झालेले असले, तरी क्लेम होऊन जाईल, असा विचार करून निर्धास्त असतो. मात्र, आता यापुढे विम्याबरोबर पीयूसीही काढून बरोबर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अप्रत्यक्षपणे घटनेनंतर पीयूसीशिवाय क्लेम मिळणार नाही, असे बोलले जात आहे.

मात्र, आयआरडीएने सुधारित आदेश जारी करीत विमा नूतनीकरणाच्या वेळी पीयूसी असणे बंधनकारक केले असल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. यामुळे पीयूसी केंद्रांना पुन्हा संजीवनी मिळाली आहे. विमा किती महत्त्वाचा, याचा प्रत्यय कोरोनाकाळात अनेकांना आला. या काळात सर्वाधिक आरोग्य विमा काढले गेले.

सरकारनेही कोरोना महामारीचा समावेश व्याधीच्या यादीत करण्याचे आदेश जारी केले. आरोग्य विम्यानंतर सर्वाधिक वाहन विमाही काढले गेले. वाढती विम्याची संख्या लक्षात घेता मागील काही वर्षांत क्लेमचीही संख्या वाढली होती. विमा कंपन्यांनी यावर आवाज उठवून केंद्राचे लक्ष वेधून घेत त्यांच्या अडचणी मांडल्या.

सर्व बाबींना विचारात घेत केंद्राच्या सूचनेनुसार आयआरडीएने एक अधिसूचना जारी करून विमा काढताना वाहनाचा पीयूसीही असणे बंधनकारक केले. विमा कंपन्यांनी त्या आदेशाचा अर्थ असा काढला की, क्लेमसाठी आलेल्या वाहनाचे पीयूसी त्या वेळी नसेल, तर क्लेमही मिळणार नाही. हाच संदेश देशभर वायरल झाला आणि चर्चेला सुरुवात झाली.

आम्ही असे बोललोच नाही…
गोंधळानंतर आयआरडीएने पुन्हा एक आदेश जारी केला. त्यात त्यांनी असे स्पष्ट केले की, आमच्या आदेशाचा असा अर्थ निघत नाही, की पीयूसी नसेल तर क्लेम मिळणार नाही, असे कुठेच दिसत नाही. कोणत्याही वाहनाचा विमा काढताना त्या वाहनाचे पीयूसी गरजेचे आहे. चुकीचा अर्थ काढून विमाधारकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी पुन्हा नवे आदेश जारी केले गेले. त्यानुसार कोणताही वाहन विमा नूतनीकरण करताना पीयूसी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

पीयूसीची बदली पद्धत…
रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे. पहिल्यांदा कोणत्याही वाहनात जास्त प्रदूषण निघाल्यास अ‍ॅडजस्टमेंट केली जात होती. मात्र, आता जास्त प्रदूषण निघाल्यास सेंटरचालकाकडून पीयूसी रिजेक्ट पावती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन 1989 कायद्यांमध्ये केलेल्या बदलानुसार समान प्रमाणपत्रासाठी नवीन फॉरमॅट देऊन त्यावर क्यूआर कोड असणार आहे. कोड स्कॅन करताच वाहनाची संपूर्ण माहिती पाहणे सोपे होणार आहे.

Back to top button