बारामतीच्या जिरायती भागात पेरण्या रखडल्या | पुढारी

बारामतीच्या जिरायती भागात पेरण्या रखडल्या

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : उंडवडी सुपे, उंडवडी क.प., बनवाडी, जराडवाडी, साबळेवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, देऊळगाव, खराडेवाडी, शिर्सुफळ आदींसह आजूबाजूच्या परिसरात झालेल्या अतिपावसाचा शेतकर्‍यांना फटका बसला आहे. सद्यःस्थितीत काही शेतकर्‍यांच्या शेतात पाणी असल्याने रब्बी हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम हातातून जातो की काय, अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे.

दरवर्षी जिरायती भागात पाऊस कमी असतो. परंतु यंदा पाऊस भरपूर झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी वाहत आहे. बहुतांश भागातील पेरण्या महिनाभर लांबणार अशी परिस्थिती सध्या जिरायती भागात पहायला मिळत आहे. दुसरीकडे ज्या मोजक्या शेतकर्‍यांच्या शेतातील पाणी वाहून गेले अशांनी आता रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू कांदा, लसून, मका आदींसह तरकारीची पेरणी केली आहे.

महिनाभर पाणी आटणार नसल्याची स्थिती
उंडवडी क.प. येथील शेतकरी रमेश जराड यांच्या गट नंबर 436 या शेतात अजूनही पाणी असून जवळपास महिनाभर तरी शेतातील पाणी आटणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा पिकाची पेरणी सध्या तरी करता येणार नसून वापसा झाल्यानंतरच कोणते पीक घेता येईल हे ठरवावे लागणार आहे.

रब्बी हंगामातील साडेचार हजार एकरावरील ज्वारीच्या पेरण्या झाल्या असून वापशामुळे राहिलेल्या ज्वारीच्या पेरण्या सध्या सुरू आहेत. ओढ्या, नाल्याशेजारील ज्या शेतात पाणी आहे अशा शेतात गहू, हरभरा ही पिके जसा वापसा येईल तशी होतील. थोड्या शेतातील ज्वारीच्या पेरण्या रखडल्या आहेत.

                                              – अरविंद यमगीर, कृषी मंडल अधिकारी

Back to top button