ताथवडे : ग्राहकांना हेल्मेट देण्यास वितरकांकडून टाळाटाळ | पुढारी

ताथवडे : ग्राहकांना हेल्मेट देण्यास वितरकांकडून टाळाटाळ

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : ग्राहकाने दुचाकी खरेदी केल्यानंतर त्यांना हेल्मेट देण्यास बर्‍याच वितरकांकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा वितरकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्राहक दुचाकी विकत घेताना शासनाचे आवश्यक ते सर्व कर भरतो. चालू वर्षात पिंपरी चिंचवड शहरात सर्वच कंपन्यांच्या दुचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियमानुसार वाहन वितरकांनी ग्राहकाला गाडी विकताना हेल्मेट देणे बंधनकारक आहे. परंतु शहरामध्ये अनेक वितरक ग्राहकांनी हेल्मेटची मागणी केली तरी हेल्मेट देत नाहीत. ग्राहकाकडून रक्कम घेतली जाते आणि गाडीची नोंदणी केली जाते, परंतु नियमाप्रमाणे हेल्मेट दिले जात नाही.

रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी दुचाकीची विक्री करतानाच खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नसून,नागरिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा त्यांना हेल्मेट न देता दुचाकी वाहन वितरक ग्राहकांचा विश्वासघात व फसवणूक करीत आहेत, अशी तक्रारी नागरिकांकडून होत आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील सर्व वाहन वितरकांची याबाबत चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची व्हावी.

‘हेल्मेट देण्यास टाळाटाळ करणार्‍याविरुद्ध कारवाई करा’
ग्राहकांना दुचाकी विकत घेताना हल्मेट न दिल्याच्या अपना वतन संघटनेकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यानुसार संघटनेने केलेल्या पाहणीनुसार वाहन वितरकांनी शहरातील बर्‍याच जणांना हेल्मेट दिले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 नियम 138 (4) फ तसेच मा. मुंबई उच न्यायालय औरंगाबाद खंडपीठ क्रिमिनल सुमोटो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर 2 /2021 मधील निर्देशानुसार,तसेच जनहितयाचिका क्रमांक 09/2019 मुंबई उच न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार कंपनीने व वितरकाने गाडी विकतानाच अनेक ग्राहकांना 2 हेल्मेट दिलेलेच नाहीत. त्यामुळे या आधारे पिंपरी चिंचवडमधील अशा दुचाकी वितरकांविरुद्ध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी अपना वतन संघटनाचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी केली आहे.

रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने 2021 मध्ये दुचाकी खरेदी करतानाच वितरकाने हेल्मेट देण्याबाबत सूचना केलेल्या होत्या. तसेच केंद्रीय मोटार परिवहन कायद्यानुसार तसेच मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार हेल्मेट देणे बंधनकारक आहे. परंतु याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अशा वितरकांवर गुन्हे दाखल करावेत.
                        -सिद्दिक शेख, संस्थापक अध्यक्ष,अपना वतन संघटना

पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिक सर्रासपणे हेल्मेटविना फिरताना आढळतात. अपघातांची संख्या रोखण्यासाठी नागरिकांनी हेल्मेट वापरले पाहिजे. त्यामुळे हेल्मेट हे दुचाकी खरेदी करतानाच द्यायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे. नागरिकांनी आग्रहाने हेल्मेट वापरावे.
                      -सत्यवान माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस स्टेशन

Back to top button