वडगाव निंबाळकर : वखारीतील कांदा बाजारपेठेकडे! | पुढारी

वडगाव निंबाळकर : वखारीतील कांदा बाजारपेठेकडे!

वडगाव निंबाळकर; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील वडगाव निंबाळकर, कोर्‍हाळे आदी गावातील शेतकर्‍यांनी चाळीमध्ये साठवलेला कांदा बाहेर काढून त्याची प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवण्यास सुरुवात केली आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. त्यामुळे प्रतवारीत चांगला कांदा अत्यंत कमी निघत आहे. दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

सध्या या परिसरात चाळीतून कांदा बाहेर काढला जात आहे. एप्रिल, मे महिन्यात तो चाळीत टाकण्यात आला होता. परंतु यंदा सतत बदलणारे हवामान, पावसाने दिलेला जोराचा तडाखा यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदे खराब निघत आहेत. कांदा विक्रीला नेल्यानंतर व्यापारी पिशवीतील एखादा कांदा डाग पडलेला अथवा कोंब आलेला असला तरी त्याचे भाव पाडतात. प्रतवारी करून चांगला माल निवडून पिशवीत भरला तरी बाजारपेठेत त्याला किंमत राहत नाही. त्याचा फटका बाजारभावाला बसतो आहे. त्यामुळे शेतकरी निराशा व्यक्त करत आहेत.

सध्या कांद्याला जास्तीत जास्त 30 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तो देखील अत्यंत चांगल्या दर्जाच्या कांद्याला मिळत आहे. मध्यम प्रकारच्या कांद्याला 20 ते 25 रुपये दर मिळत आहे. परंतु कांदा आणखी खराब होण्यापेक्षा आहे तो दर पदरात पाडून शेतकरी विक्रीला नेत आहे. त्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय उरलेला नाही. सध्या कांदा बाजारपेठेत जात असला तरी भविष्यात कांद्याचे दर वाढतील त्यावेळी शेतकर्‍याकडे कांदा विक्रीसाठी उपलब्ध नसणार हे नक्की.

कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व खर्चिक
कांदा काढणीवेळी चांगला दर मिळत नसल्याने तो साठवून ठेवण्याची वेळ शेतकर्‍यांवर येते. कांदा साठवणुकीसाठी चांगली चाळ तयार करून त्यात तो भरून ठेवावा लागतो. त्यानंतर तो खराब होण्यापूर्वी बाहेर काढून महिला मजुर लावून स्वच्छ करून त्याची प्रतवारी करावी लागते. तो पिशवीत भरून बाजार समित्यांमध्ये पाठवावा लागतो. ही सगळी कामे अतिशय खर्चिक आहेत. कांदा उत्पादनासाठी सरी काढण्यापासून ते लागवड, रोपे, तणनाशक, खुरपणी, कांदा काढणी हा खर्च वेगळा असतो.

Back to top button