अकरावी प्रवेशाचे वाजले की बारा ! | पुढारी

अकरावी प्रवेशाचे वाजले की बारा !

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : यंदा दहावीचा निकाल जवळपास 100 टक्के लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यात झुंबड उडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात मात्र दुसरी फेरी झाल्यानंतर राज्यभरात उपलब्ध जागांच्या जवळपास दीड लाख जागांवर विद्यार्थ्यांचे अर्जच आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याऐवजी प्रवेशाचेच बारा वाजले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी संपल्यानंतर आता तिसर्‍या फेरीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु दुसर्‍या फेरीनंतर उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी 1 हजार 492 महाविद्यालये उपलब्ध आहेत. या महाविद्यालयांमध्ये 5 लाख 32 हजार 970 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी केवळ 3 लाख 77
हजार 912 विद्यार्थ्यांनीच नोंदणी केलेली आहे.

म्हणजेच 1 लाख 55 हजार 58 जागा या रिक्?तच राहणार असल्याचे दिसून येत आहे. तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी दुसर्‍या फेरीपर्यंत 1 लाख 83 हजार 794 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक कमी प्रवेश मुंबईत झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत 3 लाख 20 हजार 40 जागांसाठी केवळ 1 लाख 8 हजार 402 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर सर्वाधिक प्रवेश नागपूर जिल्ह्यात झाले असून नोंदणी केलेल्या 30 हजार 566 विद्यार्थ्यांपैकी 18 हजार 919 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी तिसरी फेरी सध्या सुरू असून 1 लाख 60 हजार 479 विद्यार्थ्यांचे पर्याय घेऊन अर्ज निश्चित करण्यात आले आहेत. परंतु प्रवेशासाठी मात्र 3 लाख 49 हजार 176 जागा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुपटीहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सोमवारी 13 सप्टेंबरला तिसर्‍या फेरीची प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे.

Back to top button