सिंहगड-राजगड रविवारी ‘हाऊसफुल्ल’; दिवाळी सुटीचा आनंद पर्यटकांनी घेतला | पुढारी

सिंहगड-राजगड रविवारी ‘हाऊसफुल्ल’; दिवाळी सुटीचा आनंद पर्यटकांनी घेतला

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या सुटीतील अखेरच्या रविवारी ( दि. 30) सिंहगड किल्ला देशभरातील पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’ झाला होता. दुर्गम राजगड व तोरणा गडासह पानशेत धरण परिसरही पर्यटकांनी गजबजून गेला होता. वेगाने वाहणार्‍या कडाक्याच्या थंडगार वार्‍याची पर्वा न करता लहान मुले, महिला, तरुणाईने गडकोटांवर, धरण परिसरात दिवाळीच्या सुटीचा आनंद साजरा केला.
रविवारी सकाळपासूनच सिंहगडावर पुणे, मुंबई ठाणे, राज्यासह देशभरातील पर्यटकांची वर्दळ सुरू होती.

सकाळी अकरानंतर पर्यटकांची गर्दी वाढली. वनविभागाने गडाच्या पायथ्याच्या डोणजे, गोळेवाडी व अवसरवाडी टोलनाक्यापासून घाट रस्ता, गडावरील टोलनाक्यावर वाहतुकीचे नियोजन केले होते. तरीही एकाच वेळी दोन्ही मार्गांनी वाहनांची वाहतूक वाढल्याने काही काळ घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिंहगड वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी सुरक्षा रक्षकांसह अवसरवाडी फाट्यावर धाव घेतली.

नितीन गोळे, मंगेश गोफणे, रमेश खामकर आदी सुरक्षारक्षक पायथ्यापासून वाहनतळापर्यंत धावपळ करत होते, रात्री आठ वाजेपर्यंत गडावर पर्यटकांची वर्दळ सुरू होती. नरवीर तानाजी मालुसरे समाधी, छत्रपती राजाराम महाराज समाधी स्थळ तसेच गडाचा परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता. गडावरील वाहनतळ फुल्ल झाल्याने थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या.

अवसरवाडी फाट्यावरही वाहने उभी राहत असल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली होती. अतिबिकट घाट रस्त्यातच वाहने उभी करणार्‍या पर्यटकांना समज देऊन वाहने हटविण्यात आली. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली. सिंहगड विक्रेता संघटनेचे विश्वनाथ मुजुमले म्हणाले, वाहनतळावर शिस्तबद्ध पद्धतीने वाहने उभी केल्यास तसेच घाट रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई केल्यास वाहतूक ठप्प पडणार नाही. सुटीच्या दिवशी वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे.

राजगड तसेच तोरणा गडावर सकाळपासून पर्यटकांनी वर्दळ सुरू होती. राजगडावर दिवसभरात दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. धोकादायक तटबंदी बुरुजावर जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी राजगडाचे पुरातत्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक आकाश कचरे, विशाल दीपक पिलावरे धावपळ करत होते.

Back to top button