पिंपरी : ऐन दिवाळीत पाणीपुरवठा विस्कळीत रावेतमध्ये वाहिनी फुटली | पुढारी

पिंपरी : ऐन दिवाळीत पाणीपुरवठा विस्कळीत रावेतमध्ये वाहिनी फुटली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : रावेत येथील बंधार्‍यातून उचललेले अशुद्ध पाणी निगडीच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रास पुरवठा करणारी वाहिनी रावेत येथे फुटली. वाहिनी फुटल्याने गळतीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ऐन दिवाळीमध्ये सलग दोन दिवस पाणी न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान येत्या रविवार (दि.30) पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पालिकेने केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना नदीतील पाणी रावेत येथील बंधार्‍यातून उचलले जाते.

ते पाणी शुद्ध करण्यासाठी सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात 1,400 मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीद्वारे पाठविले जाते. त्या अशुद्ध पाण्याची रावेत येथील वाहिनी पाडव्याच्या दिवशी बुधवारी (दि. 26) सकाळी दहाच्या सुमारास फुटली. जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने वाहिनी फुटल्याचे लक्षात आले. त्याचा शोध घेतला असता रावेत येथील पेट्रोल पंपाजवळ वाहिनी फुटल्याचे दिसून आले. तेथे तीन ते चार जेसीबीच्या सहाय्याने दुपारी बाराला खोदकाम सुरू करण्यात आले. पालिका, एमआयडीसी व इतरांच्या विविध सेवावाहिन्या असल्याने दक्षता घेऊन खोदकाम करण्यात आले.

तरीही दोन ते तीन सेवावाहिन्या तुटल्या. जमिनीत 25 फूट खोलीवर असलेली नादुरूस्त वाहिनी रात्री आठला आढळून आली. तेथे साचलेले पाणी चार मोटारपंपांद्वारे बाहेर काढण्यात येत होते. दुसर्‍या दिवशी गुरूवारी (दि.27) पहाटे पाचला फुटलेली वाहिनी आढळून आली. तातडीने सकाळी आठला दुरूस्तीकाम हाती घेण्यात आले. नादुरूस्त वाहिनी बदलून नवीन वाहिनी जोडण्यात आली. ते दुरूस्ती काम दुपारी तीनला संपले.

सुमारे 32 तासांनंतर अशुद्ध पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आला. त्यानंतर निगडी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शुद्ध पाणी शहरातील टाक्यांना पुरविण्यास सुरूवात करण्यात आली; मात्र तब्बल 32 तासांचा शटडाऊन झाल्याने टाक्या रिकाम्या राहिल्याने शहरातील बहुतांश भागांत पाणीपुरवठा झाला नाही. काही भागात कमी वेळ पाणी आले. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी असा प्रकार घडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने त्यांना उत्तरे देतादेता अधिकार्‍यांच्या नाकीनऊ आले होते. सध्या तीन तासाऐवजी एक तास पाणी दिले जात आहे. हा प्रकार रविवार (दि.30) पर्यंत राहणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पालिकेने केला आहे.

स्थिती पूर्ववत झाल्यानंतर नियमितपणे पाणीपुरवठा
युद्धपातळीवर दुरुस्तीकाम पूर्ण करून शहरात नियमितपणे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शटडाऊनमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पूर्ववत स्थितीनंतर नियमितपणे योग्य दाबाने पाणी वितरण केले जाणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागप्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले आहे.

या भागांना बसला फटका :
कृष्णानगर, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, नेवाळेवस्ती, सुदर्शननगर, शरदनगर, कोयनानगर, केशवनगर, चिखली गावठाण, कुदळवाडी, पवारवस्ती, हरगुडेवस्ती, अजंठानगर, चिखली, जाधववाडी, त्रिवेणीनगर, आकुर्डी, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर, काळभोरनगर, विद्यानगर, ओटा स्किम, रूपीनगर, तळवडे, जोतीबानगर, नेहरूनगर, उद्यमनगर, यशवंतनगर, गवळीमाथा, खराळवाडी, गांधीनगर, कामगारनगर, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, वास्तू उद्योग, लालटोपीनगर, महेशनगर, विठ्ठलनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर.

16 वर्षांपूर्वीची जलवाहिनी :
रावेत बंधारा ते निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे 4 किलोमीटर अंतराची 1,400 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. वाहिनी 25 फूट खोल आहे. वाहिनी टाकून 16 वर्षे झाले आहेत. वाहिनी कशी फुटली याचा शोध पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घेत आहेत.

Back to top button