पुणे : तरुणाचा खून करून अपघाताचा रचला बनाव | पुढारी

पुणे : तरुणाचा खून करून अपघाताचा रचला बनाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वाळू उपसण्याचे काम करणार्‍या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून अपघाताचा बनाव करणार्‍या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार लक्ष्मण सुपेकर (वय 22, सध्या रा. गणपती माथा, वारजे, मूळ रा. पठारवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या 7 जणांना अटक केली आहे. अजय ऊर्फ पप्पू राजेंद्र पवार (वय 30), बाळासाहेब ऊर्फ बाळू भाऊ गजरे (वय 40), निखिल ऊर्फ सोन्या एकनाथ चोरे (वय 19, रा. गणपती माथा, वारजे), विजय नामदेव गांजरे (वय 40, रा. राहुलनगर, शिवणे), सचिन आदिनाथ कापसे (वय 41, रा. शिवणे), रोहित ढिले (वय 29, रा. कुडजे गाव), गणेश माणिक शिंदे (वय 47, रा. न्यू आहिरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खडकवासला धरण परिसरातील सिंहगड सृष्टीच्या मागील बाजूला 10 ऑक्टोबरपूर्वी घडला होता. दरम्यान तरुणाचा खून नेमक्या कोणत्या कारणातून केला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली आहे.

ओंकार हा अजय पवार याच्याकडे काम करीत होता. तो खडकवासला धरणाजवळील एका गावात वाळू काढण्याच्या ठिकाणी ट्रॅक्टर चालविण्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो हेच काम करण्यासाठी आपल्या गावाहून पुण्यात आला होता. 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता तो इतरांबरोबर वाळू काढण्यासाठी गेल्यानंतर काही वेळ ओंकार हा पोकलँडमध्ये झोपला होता. सकाळी साडेसात वाजता गणेश शिंदे हा वाळू भरण्यासाठी आला असताना रस्त्याच्या कडेला चटईवर पांघरुण अंगावर घेऊन झोपलेला व नाकातोंडातून रक्त येत असलेला ओंकार त्याला दिसला. त्याने इतरांना बोलावून घेतले. येथे पोलिस आले तर आपला वाळू काढण्याचा पॉइंट बंद होईल, म्हणून त्यांनी डंपरमध्ये ओंकारचा मृतदेह टाकून तो सांगरुण येथे रस्त्याच्या कडेला टाकून दिला.

शवविच्छेदनात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला असे कारण देण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या 7 जणांची नावे निष्पन्न झाली. ओंकार याच्या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. खुनानंतर अपघात झाल्याचा बनाव केला. त्याचे अंथरुण, पांघरुण व मोबाईल फेकून देऊन पुरावा नष्ट केला. शवविच्छेदनात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली.

Back to top button