सोमवारी मुसळधार पाऊसाने पुण्याची केली दैना, अजित पवार म्हणाले, ‘भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं’ | पुढारी

सोमवारी मुसळधार पाऊसाने पुण्याची केली दैना, अजित पवार म्हणाले, 'भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं'

पुढारी ऑनलाईन: पुणे शहरात सोमवार १७ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील यंत्रणा किती कुचकामी आहे, याचा प्रत्यय नागरिकांना आला. आता याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपला धारेवर धरले. लोकांना स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पूर्णपणे वाटोळं करून ठेवलं आहे. सोमवारी संध्याकाळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. महानगर पालिकेला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

सध्या पुण्यातील नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही सर्वजण पाठपुरावा करतंच आहोत. नागरिकांनी देखील आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घ्यावी असं आवाहन करतो. शहरातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. त्याचा आढावा आम्ही घेत आहोत, असेही अजित पवार यांनी म्हटले.

 

सोमवारी पुण्यात पावसाचा हाहा:कार

सोमवारी परतीच्या पावसाने पुण्यात अक्षरशः हाहा:कार माजवला. रात्री पाऊणेदहाच्या सुमारास सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. साडेनऊ ते अकराच्या सुमारास मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. जागोजागी पाणी साचल्याने पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली. अवघ्या सव्वा तासात ९० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद शिवाजीनगर येथील पर्जन्यमापक केंद्रावर झाली आहे.

आजही पाऊस पुण्याला झोडपणार

दिवाळीचा सण तोंडावर असताना पुणेकरांना आजही मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात विजांच्या कडकडाटा आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यासह राज्यातील दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Back to top button