छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांना निधी मागणार : सासवडे | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांना निधी मागणार : सासवडे

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जो काही निधी लागेल तो माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणार आहे. या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे माजी संचालक रामभाऊ सासवडे यांनी केले.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या आवारातील समस्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रखडलेल्या स्मारकाबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्तमालिका प्रसिध्द केली आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सासवडे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी शहरप्रमुख मयूर थोरात, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शहर संघटक सुरेश गाडेकर, उपतालुकाप्रमुख संतोष वर्पे, भाजपचे शहर उपाध्यक्ष नीलेश नवले, सरचिटणीस विजय नर्के, संतोष गव्हाणे आदी उपस्थित होते. या वेळी रामभाऊ सासवडे यांनी सांगितले की, विकासकामांना आमचा विरोध नाही.

मात्र, जर काही चुकीच्या बाबी बाजार समितीमध्ये घडत असतील, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी कोणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. त्यामुळे बाजार समितीने प्राधान्यक्रमाने स्मारकाचे काम हाती घ्यावे व बाजार समितीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आढळराव यांच्या नेतृत्वाखाली लवकर भेटणार असल्याचे सासवडे यांनी या वेळी सांगितले.

Back to top button