पारगाव : बटाट्यावर लाल कोळीचा प्रादुर्भाव | पुढारी

पारगाव : बटाट्यावर लाल कोळीचा प्रादुर्भाव

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. शेतकर्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी सुरू केली आहे. अतिपावसाच्या संकटानंतर आता बटाट्यावर लाल कोळी, करपाचे संकट आल्याने बटाटा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

रांजणी, नागापूर, थोरांदळे परिसरात बटाटाचे पीक सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात आले आहे. यंदा बटाटा पिकाला सुरुवातीपासूनच अतिपावसाचा फटका बसला. पावसाचे संकट दूर झाले असले, तरी गेल्या पाच-सहा दिवसांपासून वातावरणातील उष्णतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. यामुळे बटाटा पिकावर आता लाल कोळी, करपाचा प्रादुर्भाव झाला आहे. लाल कोळी ही कीड बटाट्याच्या रोपांच्या शेंड्यांवर येते. ती बटाटा रोपांच्या पानातील रस शोषून घेते. रांजणी परिसरात बटाट्यावर लाल कोळीचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने शेतकर्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बटाट्यावर औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे. वातावरणात अचानक उष्णतेचे प्रमाण वाढल्याने बटाटा पिकावर लाल कोळी, करपाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. औषधांनाही कीड दाद देत नसल्याने बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
                                                                           – केतन टेमगिरे, थोरांदळे

 

Back to top button