राजगड-तोरणागड तरुणाईने बहरले; नियोजनामुळे सिंहगड घाटातील वाहतूक सुरळीत | पुढारी

राजगड-तोरणागड तरुणाईने बहरले; नियोजनामुळे सिंहगड घाटातील वाहतूक सुरळीत

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तोरणागड व राजगड तरुणाईने बहरून गेले होते. रविवारी (दि. 9) सकाळपासून गडाच्या पायी मार्गावर पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. सुट्यांच्या दिवशी पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने तसेच सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्त्यावरील वाहतूक दिवसभर सुरळीतपणे सुरू होती.

खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हवेली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड लावून वाहतूक पोलिस तैनात केले होते. हवेलीचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, अजय पाटसकर, संतोष भापकर यांच्यासह पोलिस जवानांची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी धावपळ सुरू होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत होती.

तोरणागडावर दिवसभरात दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. पुणे, मुंबई, कोल्हापूरसह देशभरातील पर्यटक, महाविद्यालयीन तरुण, तरुणी भल्या सकाळपासून वेल्हे व मेटपिलावरे मार्गाने तोरणागडावर चढाई करीत होते. बिन्नी दरवाजा, कोकण दरवाजा, झुंजार माची, मेंगाई मंदिर परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता.

उंच डोंगरकड्यावरील तटबंदी, बुरुजाचे मार्ग पावसामुळे निसरडे झाले आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याचे पाहरेकरी दादू वेगरे, सुरक्षारक्षक राजू बोराणे, ओंकार सांगळे धावपळ करीत होते. राजगडाच्या संजीवनी, सुवेळा, पद्मावती माच्यांसह बालेकिल्ल्यावर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. राजगडाचे पाहरेकरी बापू साबळे, आकाश कचरे आदी सायंकाळी उशिरापर्यंत गडावर तळ ठोकून होते.

Back to top button