तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावर खड्डा | पुढारी

तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावर खड्डा

तळेगाव ढमढेरे, पुढारी वृत्तसेवा: तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर रस्त्यावर पावसाने मोठा खड्डा पडला आहे. परिणामी गंभीर अपघातांची शक्यता आहे. या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील मुरुळओढा या ठिकाणच्या तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावर बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने मोठा खड्डा पडला आहे. अचानक सुरुवात झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. मुरुळओढा येथील कमी उंचीच्या पुलावर पाणी जोरात वाहत होते. या वेळी वाहनचालकांची गैरसोय झाल्याने त्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला होता.

तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बर्‍याच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शिक्रापूर येथून तळेगाव ढमढेरेला येणारी वाहतूक पर्यायी मार्ग एलअँडटी फाट्याकडून तळेगाव ढमढेरेला वाहतूक सुरू होती. तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील मुरुळओढ्याच्या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये शुक्रवारी रात्रीच्या वेळी खड्ड्यात अपघात झाला. शिक्रापूरकडून तळेगाव ढमढेरे या दिशेला कचरा वाहतूक करणारा ट्रक आदळला आणि पलटी झाला. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने अचानक रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज चुकल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button