पुणे: पोलिस ठाण्या समोरीलच पीझा हट दुकान फोडले | पुढारी

पुणे: पोलिस ठाण्या समोरीलच पीझा हट दुकान फोडले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात दिवसेंदिवस घरफोडीचे गुन्हे वाढत असताना आता चोरटे निर्ढावल्याचे दिसत आहे. त्यांनी पोलिस ठाण्यापासून 100 पाऊलांच्या अंतरावर असलेले पीझा हटचे शॉप फोडून 45 हजारांची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर भिकाजी कोकणे (25, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, कात्रज परिसरात भारती विद्यापीठच्या समोरच पिझ्झा हटचे शॉप आहे. तर भारती विद्यापीठाला लागूनच स्वारगेट कात्रज रोडवर भारती विद्यापीठ पोलिस ठाणे आहे. रात्री पिझ्झा हटचे शॉप बंद करून कामगार घरी गेले असताना, बुधवारी पहाटे चोरट्यांनी शॉपचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील लॉकरमधील एकूण 44 हजार 775 रूपयांची रोकड चोरून नेली. महत्वाची बाब म्हणजे पोलिस ठाण्याच्या अगदी समोर शंभर पाऊलांच्या अंतरावरच हे पिझ्झा हटचे शॉप आहे. रस्त्याच्या अगदी कडेला असलेले दुकान चोरट्यांनी फोडून रोकड लांबवली असताना पोलिसांना याची साधी भणकही कशी लागली नाही असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. शहरात एकीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिस ठाण्यासमोरच घरफोडी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुन्ह्याचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहे.

Back to top button