पिंपरी : सततच्या व्हायरल इन्फेक्शनने पालक चक्रावले | पुढारी

पिंपरी : सततच्या व्हायरल इन्फेक्शनने पालक चक्रावले

दीपेश सुराणा
पिंपरी : मुलांना एकदा ताप येऊन गेल्यानंतर पुन्हा ताप येणे किंवा सर्दी, खोकला होणे आदी आजार होत आहेत. मुले उपचारानंतर बरी झाल्यावर त्यांना पुन्हा ‘व्हायरल इन्फेक्शन’ होत असल्याने पालक चक्रावले आहेत. तथापि, गेल्या आठवडाभरापासून ‘व्हायरल इन्फेक्शन’ होणार्‍या बालरुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. अ‍ॅाक्टोंबर महिना सुरू झाला असून, कडक ऊन पडू लागल्यानंतर त्याचे प्रमाण आणखी कमी होईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

एका रुग्णालयात दिवसाला 100 मुलांची तपासणी
पावसाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, ताप हे आजार सुरू होतात. त्याचप्रमाणे, डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढतो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून व्हायरल इन्फेक्शनने आजारी पडण्याचे मुलांचे प्रमाण वाढले होते. या कालावधीत दिवसाला सरासरी 150 ते 200 मुले एका रुग्णालयात तपासली जात होती. गेल्या आठवडाभरापासून हे प्रमाण कमी झाले आहे. सध्या दिवसाला सरासरी 100 मुले एका रुग्णालयात व्हायरल इन्फेक्शन झाल्याने तपासण्यासाठी येत आहेत.

सर्दी, खोकला, ताप आणि डेंग्यूचे रुग्ण
शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये सध्या लहान मुलांमध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप आणि डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे सर्दी, खोकला, ताप झालेली मुले उपचार करून बरी झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आजारी पडत आहेत. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडत आहे. याबाबत तज्ज् डॉक्टरांना विचारणा केली असता ज्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते ती मुले पुन्हा-पुन्हा आजारी पडतात. त्याऊलट रोगप्रतिकारशक्ती चांगली असणार्‍या मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते.

हॅन्ड, फूट, माऊथचीदेखील लागण
मुलांमध्ये हॅन्ड, फूट, माऊथ या रोगाचीदेखील लागण होत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. या आजारामध्ये मुलांना सुरुवातीला ताप येतो. तसेच, हात, पायाचा तळवा आणि तोंडामध्ये पुरळ येते. या आजाराची मुलांना लागण होत असली तरी हा संसर्गजन्य आजार फारसा तीव— नाही. या आजारात आठ ते दहा दिवसांत मुले बरी होतात. 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. सध्या दिवसाला या आजाराचे 7 ते 8 बालरुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. हा गंभीर आजार नसून, त्यामुळे जिवाला धोका नसल्याचे मत बालरोगतज्ज् डॉ. जगदीश ढेकणे यांनी व्यक्त केले.

काय काळजी घ्याल ?
मुलांना सकस आहार द्यावा.
मुले आजारी असल्यास त्यांना शाळेत पाठवू नये, म्हणजे संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.
मुलांना भरपूर पाणी पिण्यास सांगावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक औषधे द्यावी.
मुलांना पुरेशी विश्रांती घेऊ द्यावी.

गेल्या आठवडाभरापासून ‘व्हायरल इन्फेक्शन’ होणार्‍या बालरुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. अ‍ॅाक्टोबर महिना सुरू झाला असून, कडक ऊन पडू लागल्यानंतर त्याचे प्रमाण आणखी कमी होईल. मुलांना पुन्हा-पुन्हा ‘व्हायरल इन्फेक्शन’ होत असल्याचे आढळत आहे. मुलांची प्रकृती आणि त्यांच्या आजाराचे स्वरुप लक्षात घेऊन त्यानुसार मुलांना औषधे दिली जातात. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना सकस आहार द्यावा.
                                                – डॉ. जगदीश ढेकणे, बालरोगतज्ज्ञ

Back to top button