पुणे : दोन वर्षांनी उघडले गांधीजींचे स्मृतिस्थळ | पुढारी

पुणे : दोन वर्षांनी उघडले गांधीजींचे स्मृतिस्थळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांच्या खंडानंतर रविवारी 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातील राष्ट्रपिता महात्मा गांंधी यांचे स्मृतिस्थळ सामान्य नागरिकांना खुले करण्यात आले होते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागरिकांनी या ठिकाणी
भेट देऊन दर्शन घेतले. महात्मा गांधीजींची अ‍ॅपेंडिसायटिसची शस्त्रक्रिया 12 जानेवारी 1924 रोजी ससून सर्वोपचार रुग्णालयात पार पडली होती. ससून रुग्णालयात ती खोली वारसा स्वरुपात जतन करून ठेवण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर रविवारी, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी स्मारक सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा हे स्मृतिस्थळ प्रथमच सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. ससून सर्वोपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया झालेले महात्मा गांधी स्मारक हे गांधी जयंतीदिवशी 2 ऑक्टोबर रोजी आणि गांधी पुण्यतिथी अर्थात 30 जानेवारी असे वर्षातून दोन दिवस खुले ठेवण्यात येते. ही इमारत व खोलीदेखील वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण ससून रुग्णालयात होते. त्यामुळे वर्षातील दोन्ही दिवशी स्मारक बंद ठेवण्यात आले होते.

महात्मा गांधी यांना 18 मार्च 1922 रोजी कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 12 जानेवारी रोजी सिव्हिल सर्जन कर्नल मेडॉक यांनी महात्मा गांधी यांच्यावर अ‍ॅपेंडिसायटिसची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया सुरू असताना विद्युतप्रवाह मध्येच बंद पडला होता. कंदीलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

महात्मा गांधीजींना 4 ऑगस्ट 1933 रोजी एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. येरवडा तुरुंगात राहून हरिजन चळवळीचे कार्य चालवण्याची सवलत मिळावी, ही मागणी नाकारल्याने गांधीजींनी 16 ऑगस्ट रोजी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली. त्यांना 21 ऑगस्टला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती 23 ऑगस्ट रोजी चिंताजनक झाल्याने सरकारने बिनशर्त मुक्तता केली. गांधीजींनी रुग्णालय सोडण्यापूर्वी प्रार्थना केली आणि मोसंबीचा रस घेऊन उपोषण सोडले.

ऑपरेशन थिएटर झाले स्मृतिस्थळ…
ससून रुग्णालयातील महात्मा गांधी स्मारकामध्ये गांधीजींनी मेडॉक यांना लिहिलेले पत्र, गांधीजींच्या प्रकृतीसंबंधीचे जेल सुपरिंटेंडंट यांचे अहवाल, शस्त्रक्रिया झाल्यादिवशीची ऑपरेशन थिएटरची लिस्ट, संबंधित महिन्यातील शस्त्रक्रियांची यादी, गांधीजींची शस्त्रक्रिया, उपोषण यासंबंधीची वर्तमानपत्रातील कात्रणे, शस्त्रक्रियेचा टेबल, शस्त्रक्रियेदरम्यानचे फोटो जतन करून ठेवण्यात आले आहेत.

Back to top button