Chandani Chowk Demolish Bridge : चांदणी चौक पूल पाडण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी! या कंट्रोल ब्लास्ट पद्धतीमध्ये 600 किलो स्फोटकांचा वापर | पुढारी

Chandani Chowk Demolish Bridge : चांदणी चौक पूल पाडण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी! या कंट्रोल ब्लास्ट पद्धतीमध्ये 600 किलो स्फोटकांचा वापर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तेथील चार लेनचा पूल सहाशे किलो स्फोटके वापरून शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान हा पूल पाडण्यात आला. ६०० स्फोटके वापरून कंट्रोल ब्लास्ट पद्धतीने हा पूल पाडण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला. पूलाचा उर्वरित भाग हा पोकलेनच्या सहाय्याने पाडणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुलाच्या खाली सध्या चार लेन असून, तेथे आता 14 लेन करण्यात येणार आहेत. पूल पाडल्यानंतर ५ मिनिटे वाट पाहण्यात आली. चार पोकलेनच्या सहाय्याने याचे उर्वरित भाग पाडण्यास सुरूवात केली.

असा पाडला पूल

मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास चांदणी चौक येथील पूल स्फोटकांच्या सहाय्याने पाडण्यात आला. कंट्रोल ब्लास्ट पद्धत यासाठी वापरण्यात आली. पूल पाडण्यासाठी साधारण 35 मिमी व्यासाचे आणि दीड ते दोन मीटर खोलीचे तेराशे छिद्रे पाडण्यात आली. त्यात 600 किलो इमल्शन स्फोटके भरली होती. एक हजार 350 डिटोनेटर उपयोगात आणून नियंत्रित पद्धतीने स्फोट करण्यात आला. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांंनी यासाठी मार्गदर्शन केले.

महामार्गावरील पूल पाडण्यापूर्वी दोनशे मीटर परिघाचा परिसर सायंकाळी सहा वाजता निर्मनुष्य करण्यात आला. वाहतूक नियोजनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पूल पाडल्यानंतर सकाळपर्यंत राडारोडा हटविण्यासाठी दोनशेपेक्षा अधिक मजूर यंत्रसामुग्रीसह घटनास्थळी होते. महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर, हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाची माहिती देण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावण्यात आले होते. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते.

पुल पाडतानाची काळजी

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. पुलावर व त्याच्या बाजूला साडेसहा हजार मीटर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. त्यावर साडेसात हजार चौरस मीटरचे जिओ टेक्स्टाईल अंथरले. त्यावर जड वजन ठेवण्यासाठी वाळूच्या 500 पिशव्या ठेवण्यात आल्या. तसेच,आठशे चौरस मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला होता.

मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यात 16 एक्सेव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर यांचा समावेश आहे. पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

पोलिस अधिकारी-कर्मचारीही तैनात

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी केली पहाणी..

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीची माहिती घेतली. त्यांच्या समवेत अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Back to top button