सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका पुन्हा सुरु, 30 हजार संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा | पुढारी

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका पुन्हा सुरु, 30 हजार संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरु करण्याचे आदेश शुक्रवारी (दि.30) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यात पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धडाका सुरु होत आहे. राज्यात पुढे ढकलण्यात आलेल्या सुमारे 30 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका विविध टप्प्यावर थांबल्या होत्या, त्या आता पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झााला आहे.

राज्यात मुसळधार पावसामुळे विस्कळित झालेले जनजीवन व वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीमध्ये सहभाग नोंदविता यावा, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्पयावर असतील त्या टप्प्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत ढकललेल्या होत्या. तो कालावधी शुक्रवारी संपुष्टात आला आहे. त्यामुळे शासनाकडून सहकारी संस्थांच्या निवडणूका आणखी पुढे ढकलण्याबाबत आदेश देण्यात आलेले नाहीत. त्या पार्श्वभुमीवर सहकार प्राधिकरणाने नव्याने आदेश जारी केल्याने सहकारी संस्थांच्या निवडणूका आता पूर्ववत सुरु होत आहेत.

या बाबत प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी राज्यातील सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व तालुका सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरु कराव्यात. तसेच ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम मतदार यादी प्रसिध्दीनंतर पुढे ढकलण्यात आलेला आहे. अशा सहकारी संस्थांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम व तरतुदीप्रमाणे तयार करुन प्राधिकरणाच्या मान्यतेस पाठवावा. प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर निवडणूका कार्यक्रमास व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

Back to top button