पुण्यासह राज्याच्या काही भागांत 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा | पुढारी

पुण्यासह राज्याच्या काही भागांत 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा

पुणे : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पुण्यासह राज्याच्या काही भागांत (मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा) 3 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला गती मिळाली असून, गुरूवारी पंजाब, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थानाच्या काही भागातून परतण्यास सुरुवात झाला आहे. हा पाऊस महाराष्ट्रातून जाण्यात 5 ऑक्टोबर उजाडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वास्तविक पाहता 30 सप्टेंबरला नियमानुसार मान्सूनचा कालावधी थांबणार आहे. मात्र, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती आहे. तर मध्यपूर्व बंगालच्या उपसागरापसून ते कर्नाटक मध्यपूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत द्रोणीय स्थिती आहे, यामुळे राज्यात पाऊस बरसत आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास 21 सप्टेंबरपासून राजस्थानच्या पश्चिम भागापासून सुरू झाला आहे. दरम्यान गुरूवारी मान्सुनच्या परतीच्या प्रवासाला गती मिळाली आहे. सकाळपासून या राज्यांमध्ये पाऊस बरसत आहे. मान्सून सध्या जम्मू, ऊना, चंदीगड, कर्नाल, बागपत, दिल्ली, अलवार, जोधपूर आणि नालिया या शहरावर आहे.

3 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी यलो अर्लट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.

Back to top button