पुणे-पानशेत रस्त्यावर दरड कोसळली; तब्बल दीड तास वाहतूक ठप्प | पुढारी

पुणे-पानशेत रस्त्यावर दरड कोसळली; तब्बल दीड तास वाहतूक ठप्प

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पुणे – पानशेत रस्त्यावर सोनापूर-रुळे गावच्या हद्दीत सोमवारी (दि. 26) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाडांसह डोंगराची मोठी दरड कोसळली. तेथून जाणार्‍या नागरिकांनी प्रसंगावधानता दाखवत बाजूला वाहने उभी केल्याने दुर्घटना टळली. दरड कोसळल्याने तब्बल दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. जुलै महिन्यातही या रस्त्यावर ओसाडे – सोनापूरजवळ दरड कोसळली होती. रुळे व सोनापूरजवळ खडकवासला धरण तीरालगत खचलेल्या रस्त्याजवळ सोमवारी दरड कोसळली.

डोंगराच्या उतारावरील दगड, मातीसह एक झाड कोसळले. किरकटवाडी येथील राजेंद्र पप्पाराम कांबळे हे कुटुंबीयांसह दुचाकीवरून रुळे (ता. वेल्हे) येथे चालले होते. त्यांच्या समोरच दरड कोसळली. त्यामुळे राजेंद्र कांबळे यांच्यासह इतर वाहनचालकांनी वाहने जागेवरच थांबवली. अशीच स्थिती पानशेत बाजूच्या रस्त्यावर होती. सोनापूर येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले. दीड तासांत दरड हटविण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरू झाली. तोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले म्हणाले, पुणे-पानशेत रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने खबरदारीसाठी बांधकाम विभागाने यंत्रणा उभी केली आहे. संबंधित ठेकेदारामार्फत कोसळलेल्या दरडी काढण्यात येत आहेत. पावसाळा संपल्यानंतर धोकादायक दरडी काढणे तसेच खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अशी कामे सुरू करण्यात येणार आहेत.
पुणे – पानशेत रस्त्यावर सोनापूर – रुळे गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी झाडांसह मोठी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

असुरक्षित वाहतूक
लष्कराच्या संस्थेसह जलसंपदा, पर्यटन केंद्र, विद्युत निर्मिती केंद्र आदी शासकीय संस्था, देवदेवतांची मंदिरे पानशेत परिसरात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कायमच वर्दळ असते. ओसाडे ते रुळेपर्यंत रस्ता खचणे, दरडी कोसळण्याचे प्रकार वाढल्याने पानशेत रस्त्यावरील प्रवास असुरक्षित बनला आहे. यंदाच्या पावसाळ्यात दरडी कोसळणे रस्ता खचण्याच्या घटना तब्बल पाच वेळा घडल्या.

Back to top button