कामशेतमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत | पुढारी

कामशेतमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

कामशेत : परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा पाठलाग करणार्‍या कुत्र्यांच्या टोळीने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने रात्री उशिरा परतणार्‍यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. शहरातील गल्लोगल्ली कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मॉर्निंग वॉकला जाणार्‍यांचे प्रमाण झाले कमी
भटके कुत्रे रस्त्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना अधिक त्रास होतो. रात्री उशिरा घरी परतणार्‍यांनाही कुत्र्यांची भीती असतेच. शिवाय मॉर्निंग वॉकला जाणार्‍यांच्याही पाठीमागे ही कुत्रे लागतात. त्यात एखादा कुत्रा पिसाळला किंवा जखमी झाला, तर त्या परिसरात धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे.

विदेशी कुत्री पाळण्याची क्रेझ
पूर्वी घर आणि शेतीची राखण करण्यासाठी प्रत्येक घरी कुत्रे पाळले जायचे. हा प्राणी अतिशय प्रामाणिक असून तो रखवालदाराची भूमिका पार पाडीत असतो.

मात्र, नागरिकरणाच्या कक्षा रुंदावल्याने शेतीव्यवसाय जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आता कुत्रे पाळण्याचा कलही कमी झाला आहे. ज्यांना कोणाला आवड आहे ते विदेशी प्रजातीचे कुत्रे पाळतात. मात्र, देशी कुत्रे आता निराधार झाले आहेत. परिणामी दिवसेंदिवस भटक्या कुर्त्यांची संख्या वाढत चालली असून, त्यांचे निर्बिजीकरण होताना दिसत नाही.

Back to top button