पुणे: पथारी शुल्क आता ऑनलाइन भरता येणार | पुढारी

पुणे: पथारी शुल्क आता ऑनलाइन भरता येणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारकांना महापालिकेकडून आकारण्यात येणारे भाडे आणि थकबाकी आता ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने बँकेत स्वतंत्र खाते उघडले आहे.
शहरातील पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारक आणि मोठ्या स्टॉलधारकांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवाना दिला जातो. या व्यावसायिकांना परिसर आणि स्टॉलच्या आकारानुसार भाडे आकारले जाते. तसेच शहरातील हजारो पथारी व खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या व्यावसायिकांचे झोन तयार करून त्यांचे त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून व्यावसायिकांना आकारण्यात आलेले भाडे वेळच्या वेळी महापालिकेला जमा करणे बंधनकारक असताना अनेक व्यावसायिकांकडे एकूण 12 कोटीपेक्षा अधिक थकबाकी आहे. भाडे किंवा थकबाकी भरण्यासाठी व्यावसायिकांना प्रशासनाकडून सदर रकमेचे चलन घेऊन मग ती रक्कम भरावी लागते. या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. व्यवसाय सोडून या कामासाठी वेळ देणे व्यावसायिकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिक भाडे किंवा थकबाकी भरण्यास चालढकल करतात. परिणामी थकबाकीची रक्कम वाढत जाते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भाडे किंवा थकबाकी भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया मंगळवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले. महापालिकेच्या या सुविधेमुळे पथारी व लहान व्यावसायिकांचे जागेवरूनच पैसे जमा करता येणार आहेत. तसेच त्यांचा चलनासाठी जाणारा वेळ वाचणार आहे.

Back to top button