बांगलादेशी दाम्पत्यासाठी पुणे पोलिस ठरले बजरंगी भाईजान

बांगलादेशी दाम्पत्यासाठी पुणे पोलिस ठरले बजरंगी भाईजान
Published on
Updated on

पुणे ; महेंद्र कांबळे : बांगलादेशी दाम्‍पत्य भारतात छुप्या पध्दतीने आले होते. त्‍यांना नोकरीच्या अमिषाने पुण्यात आणले गेले, मात्र पोलिसांच्या ताब्‍यात सापडल्‍याने त्‍यांना न्यायालयाने अडीच वर्षाची शिक्षा दिली. शिक्षा भोगून आपल्‍या मायदेशी परतत असताना बांगलादेशी दाम्‍पत्‍य भावूक झाले. बजरंगी भाईजान चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे ही घटना घडली. या बांगलादेशी दांत्‍पत्‍याने पोलिसांनी दिलेल्‍या माणुसकीच्या वागणुकीबद्दल त्‍यांचे आभार मानले. या दाम्‍पत्‍यासाठी पुणे पोलिस जणू बजरंगी भाईजान ठरले.

'पुणे पोलिसांनी मला भावासारखी वागणूक दिली. आम्ही आमच्या चुकीने तब्बल अडीच वर्षे शिक्षा भोगली. भारतात आले तेव्हा हिंदी येत नव्हती; पण तुरूंगात हिंदी शिकले. मी पुणे पोलिसांना भैयाच म्हणत होते. अडीच महिन्यापूर्वी आमची शिक्षा संपली. भावासारख्या पुण्याच्या पोलिसांनी मला माझ्या मायदेशी पाठवण्यासाठी निरोप दिला. अतिशय जड अंतकरणाने पुणेरी भावांचा निरोप घेत आहे, हे भावोद्गार आहेत, बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात आलेल्या माजिदा मंडोल या महिलेचे.

माजिदा व तिचा पती मोहम्मद मंडोल हे तीन वर्षापूर्वी अगदी बजरंगी भाईजान चित्रपटातील कथानकाप्रमाणे बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातून छुप्या मार्गाने थेट पुण्यात आले. एजंटने पुण्यात नोकरी देतो, असे आमिष दाखवत विना पासपोर्ट त्‍यांना शहरात आणले गेले. नोकरी तर मिळाली नाहीच, मात्र सुंदर माजिदाला एजंटचा वाम मार्गाला लावण्याचा उद्देश होता. त्यांचे सुदैव म्हणून हे तरुण जोडपे पुणे पोलिसांच्या हाती लागले.

छुपा मार्गाने थेट भारतात आल्यामुळे बांगलादेशच्‍या दाम्‍पत्‍यावर गुन्हा दाखल झाला. न्यायालयासमोर सुनावणी झाली. त्यांना अडीच वर्षाचा कारावास झाला. त्या काळात पुणे पोलिसांनी बांगलादेशाच्या दुतावासाशी संपर्क साधला असता,हे बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. कारागृहातून सुटल्यानंतर अडीच महिने ते पुणे पोलिसांच्या देखरेखीखाली फरासखाना पोलिस ठाण्यात होते. या पोलिस ठाण्यात त्यांना माणुसकीची वागणूक देण्यात आली, अशी कबुली जाताना माजीदा हीने दिली.

अडीच वर्षाचा कारावास भोगून मायदेशी…

माजीदा व तिचा पती मोहम्मद यांनी विना पासपोर्ट भारतात आल्यामुळे अडीच वर्षाचा कारावास येरवडा कारागृहात भोगला. पण त्यांना तेथेही माणूसकीची वागणूक देण्यात आली. कारण हे दाम्पत्य नोकरीच्या शोधात भारतात फसवून आणले गेले होते.

पोलिसांनाही बजरंगी भाईजानची कथा आठवली आणि त्यांना शिक्षा झाली असली तरी त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात आली.

अडीच वर्षाच्या कारावासात हे बांगलादेशी दाम्पत्य हिंदी भाषा शिकले. रविवारी ५ सप्टेंबर रोजी पुणे पोलिसांनी या दाम्पत्याला त्यांच्या मायदेशी पाठविण्याची तयारी केली, तेव्हा माजीदासह तिच्या पतीला आनंदाश्रू आवरता आले नाही.

दाम्पत्याने जाताना भावाप्रमाणे वागणुक देणार्‍या वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे त्यांचे अमंलदार संतोष मानमोडे, समीर पवार, एफ. एन. बागवान यांचे विशेष आभार मानत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

 मुले वाट पाहत होती…

आम्हाला शिक्षा होईल असे कधी वाटले नाही. पण पोलिसांच्या ताब्यात सापडलो आणि शिक्षा झाली. आम्ही दोघेही अनभिज्ञ होतो. काहीच माहीत नव्हते. लहान मुलांना सोडून नोकरीच्या शोधात आम्‍ही भारतात आलो होतो.

पण मुलांपासून अडीच वर्ष दूर राहिल्याने एकएक दिवस एक वर्षा सारखा वाटत होता. मला तीन मुले आहेत.

ती आमची वाट पाहायची अधून-मधून फोन यायचा, फोनवर मुले रडायची, आम्ही त्यांना धीर द्यायचो, अखेर शिक्षा संपली आणि माझा जीव भांड्यात पडला. मुलांना फोन करून सांगितले आम्ही येतोय. तेव्हा आनंदाला सीमाच उरली नाही.

आता पोहचेपर्यंत एक मिनीट एका दिवसासारखा वाटतो आहे. कधी माझ्या मुलांना कुशीत घेते यासाठी मी अधीर झाले आहे असेही  माजिदाने सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडले…

पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावलेले आहे. पोलिसांनी माणुसकीची वागणूक देताच, हे  दाम्पत्य शिवाजी महाराजांच्या पाया पडले.तसेच माणुसकी वागणुकीबद्दल पुणे पोलिसांचे आभार मानले.

यावेळी फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मधुकर पोळ, महिला पोलिस हवालदार निर्मला शिंदे, विशेष शाखेचे अमंलदार केदार जाधव, किरण बरडे जाणार आहेत.

सहा दिवसांनी पोहचणार बांगलादेशात…

हे दाम्पत्य पुण्यातून ५सप्टेंबर रोजी रेल्वेने निघाले.येथून ते पश्चिम बंगालमध्ये जातील तेथून बांगलादेशाच्या सीमेपर्यंत पुणे पोलिस जाणार आहेत. पुणे पोलिसांची टीम बांगदेश सीमेपर्यंत त्यांच्या बरोबर असणार आहेत. सहा दिवसांनी हे दाम्‍पत्‍य बांगलादेशात पाेहचणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news