चाळीसगाव : हे का घडले त्या रात्री ?

चाळीसगाव : हे का घडले त्या रात्री ?
Published on
Updated on

उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव आणि धुळे येथे 30 ऑगस्टची रात्र काळरात्रच ठरली. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे दोन्ही ठिकाणी पुरस्थिती उद्भवली. प्रशासनाने अलर्टची दखल घेतली असती तर आपत्तीची तीव्रता कमी करता आली असती.

पर्यावरणाच्या असमतोलाचा परिणाम म्हणून जगभरातील अनेक शहरांवर अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती नित्य येऊन कोसळत आहेत. ऑगस्टअखेरीस त्यात उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव आणि धुळेया दोन शहरांच्या नावांची भर पडली. त्यातही चाळीसगावसाठी 30 ऑगस्टची रात्र काळरात्रच ठरली. दर हंगामात होणार्‍या यथातथा पावसामुळे काहीसे निवांत असणारे चाळीसगावकर रात्रीतून झालेल्या 133 मिलिमीटर पर्जन्यवृष्टीमुळे हबकून गेले असल्यास नवल नाही; पण त्यापेक्षाही निवांत अन् निश्‍चिंत होते ते स्थानिक प्रशासन. चाळीसगाव, धुळ्यावर ओढवलेल्या संकटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला प्रशासननिर्मित म्हटल्यास वावगे ठरणार नाही, इतके गाफील वागणे तेथील प्रशासनाचे होते. हवामान विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने तीन दिवस आधी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही चाळीसगावच्या स्थानिक प्रशासनाने तो फारसा गांभीर्याने न घेतल्याचे नुकसानीचे अफाट स्वरूप पाहता स्पष्ट होते. नदीकाठच्या गावांपर्यंत धोक्याची सूचना वेळीच पोहोचली असती, तर शेतकर्‍यांना सातआठशेच्या संख्येने पशुधन हकनाक गमवावे लागले नसते. त्यातच स्थानिक प्रशासनाला वेसण घालण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने चाळीसगावकरांची अवस्था 'मुकी बिचारी कुणी हाका' अशी झाली आहे.

चाळीसगावची भौगोलिक रचना अशी आहे की, शहराच्या मध्यवर्ती भागात डोंगरी आणि तितूर या नद्यांचा संगम होतो. रात्रीतून कोसळलेल्या तडाखेबंद पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पुराला उधाण आले. या पात्रापासून जवळपास दहा मीटर उंचीवर हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेली पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबा यांची मजार आहे. तेथपर्यंत पुराचे पाणी चढल्याने पावसाचे महाभयंकर स्वरूप लक्षात यावे. 1998 आणि 2007 चा काहीसा अपवाद वगळता अतिवृष्टी चाळीसगावकरांना स्वप्नातही नसेल; मात्र यंदा जे पाहावे लागले ते भयस्वप्न होते. ढगफुटी टाळणे कोणाच्या हातात नव्हते; मात्र तिचे दाहक परिणाम नक्‍कीच सुसह्य करता आले असते. स्थानिक प्रशासनाने वेळीच लोकांना सतर्क केले असते, तर जी काही जीवितहानी झाली, तीही टाळता आली असती. जीवापाड जपलेली गुरे-ढोरे डोळ्यांदेखत वाहून जाताना पाहण्याचे नशिबी आले नसते. दोन्ही नदीपात्रांची वेळोवेळी स्वच्छता केली असती, तर गल्ली-बोळांत पुराचे पाणी घुसले नसते. नदीपात्रातील पाणी शहरात जेथून घुसण्याची शक्यता आहे, तेथे संरक्षक भिंतीही बांधता आल्या असत्या. असे लहानसहान उपाय केले असते, तरी शहरवासीयांच्या वेदनांची तीव्रता कमी करता आली असती. नदी-नाल्यांमध्ये होणारी अनधिकृत बांधकामे ही आता जणू राष्ट्रीय समस्या बनून राहिली आहे. चाळीसगावही त्याला अपवाद नाही. नदीपात्रात बांधकामे करणारे नागरिक संकटाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, पुराचे पाणी गावठाणात घुसण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. आता या भीषण आपत्तीमुळे तरी तेथील प्रशासन आणि बेजबाबदार नागरिकांचे डोळे उघडतील, अशी आशा आहे.

पावसाने चाळीसगावचाच कित्ता दुसर्‍या रात्री धुळ्यात गिरवला. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाने शहराला झोडपले. शहरातून जाणार्‍या तीन जुन्या नाल्यांच्या मार्गातच बांधकामांचे रितसर लेआऊट टाकल्याने नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बाधित होऊन पावसाचे पाणी थेट रहिवासी वस्तीत घुसले. ऐन मध्यरात्री लोकांची धावपळ झाली. पोलिस अधिकार्‍यांच्या बंगल्यांमध्येही पाणी शिरल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या रक्षकांना रात्र जागून काढावी लागली. लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात पाणी शिरल्याने कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले. पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात तळे साचले. लळींग वनक्षेत्रातून शहराकडे येणार्‍या दोन नाल्यांमधून दोन दशकांपूर्वी वर्षातील आठ महिने पाणी खळखळून वाहताना धुळेकरांनी पाहिले आहे; पण आता त्यावर सरकारी वरदहस्तामुळे उभी राहिलेली बांधकामे कधीकाळच्याया टुमदार शहराला बकाल करत आहेत.

चाळीसगाव, धुळ्याची ही उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. ते आज जात्यात आहेत, तर इतर शहरे सुपात. सुखवस्तूपणाच्या इमल्यांनी नद्या-नाल्यांचा ऊर दडपल्याची शिक्षा आज ना उद्या सर्वांना भोगावीच लागणार आहे. प्रश्‍न आहे तो इतकाच की, त्यातल्या त्यात कमी शिक्षेवर निभावले जाण्यासाठी आपण प्रयत्न करण्यास निदान सुरुवात तरी करणार की नाही हा!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news